You are currently viewing मालवणची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर- नारायण यांचा आज पालखी सोहळा

मालवणची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर- नारायण यांचा आज पालखी सोहळा

मालवण

मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांचा ऐतिहासीक पालखी प्रदक्षिणा सोहळा आज बलिप्रतिपदा म्हणजे दीपावली पाडव्या दिवशी दि. २६ ऑक्टोबर रोजी साजरा होत असून ग्रामदैवतांच्या स्वागतासाठी मालवणनगरी सज्ज झाली आहे. कोरोना महामारी संकटाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर यावर्षी हा सोहळा निर्बंधामुक्त साजरा होणार असल्याने सोहळ्यास प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.

दि. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता देऊळवाडा येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरातून या पालखी सोहळ्यास सुरूवात होणार आहे. श्री देव रामेश्वर व नारायणाचे वर्सलदार कुटुंबिय आणि गावकर मानकरी रामेश्वरासमोर श्रीफळ ठेवून गाऱ्हाणे केल्यावर ढोल-ताशांच्या गजरात रामेश्वर व नारायणाची पालखी मालवणच्या परिक्रमेसाठी निघेल. प्रारंभी रामेश्वर मंदिराला प्रदक्षिणा करण्यात येते. हि पालखी आडवण मार्गे वायरी तानाजी नाका येथून भूतनाथ मंदिर येथे भेट दिल्यावर समुद्र किनाऱ्यामार्गे मोरयाचा धोंडा येथे भेट देऊन दांडी येथील दांडेश्वर मंदिरात काही काळ पालखी थांबणार आहे. त्यानंतर पुन्हा किनाऱ्यामार्गे मेढा येथील श्री देवी काळबादेवी मंदिर येथे पालखी थांबणार असून याठिकाणी रामेश्वर नारायण आणि त्यांची बहीण काळबादेवीचा पारंपरिक भाऊबीज सोहळा मोठ्या थाटात साजरा होणार आहे. त्यानंतर पालखी जोशी मांड येथे थांबेल. देवतांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री पालखी बंदर जेटी मार्गे मालवण बाजारपेठेत प्रवेश करून बाजारपेठेत रामेश्वर मांड येथे भाविकांना दर्शन देण्यासाठी पालखी थांबणार आहे. त्यानंतर रात्री उशिरा बाजारपेठ मार्गे भरड येथून पुन्हा देऊळवाडा येथे मंदिरात पालखी विसर्जित होणार आहे.

या पालखी सोहळ्यानिमित्त ग्रामदेवतांच्या स्वागतासाठी मालवणनगरी सज्ज झाली आहे. पालखीच्या मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई, पताका व फुलांची सजावट, पुष्पवृष्टी, रांगोळी काढणे आदी तयारीच्या कामांना वेग आला आहे. तर किनाऱ्यावर मच्छीमारांनी आपल्या नौका सजविल्या आहेत. तसेच बाजारपेठेतही व्यापाऱ्यांनी स्वागतासाठी सफसफाईची कामे उरकून दुकानांची सजावट केली आहे. यामुळे मालवणची बाजारपेठ विद्युत रोषणाईत न्हाऊन निघाली आहे.

गेल्या दोन वर्षात हा पालखी सोहळा कोरोनाच्या निर्बंधाखाली साजरा झाला होता. तर गतवर्षी या सोहळ्यास पावसानेही हजेरी लावली होती. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट ओरसले असल्याने हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या मोठ्या गर्दीत साजरा होण्याची शक्यता आहे. सध्याच्या राज्य सरकारने सर्व धार्मिक कार्यक्रमांवरील बंधने शिथील केल्याने यावर्षी उत्साहात पालखी सोहळा होणार आहे. शासनाच्या सूचनांचे पालन करून हा सोहळा होणार असल्याचे देवस्थान ट्रस्टने स्पष्ट केले आहे. यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही देवस्थान ट्रस्टने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा