शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, ओरोस येथे ५ नोव्हेंबर रोजी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम
सिंधुदुर्ग
महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत संचालित शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, ओरोस येथे गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता दीपावली स्नेहमिलन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, ओरोस ही संस्था ६ ते १८ वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रित, काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या तसेच विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ नुसार सध्या बाल कल्याण समिती, सिंधुदुर्ग यांच्या आदेशान्वये काळजी व संरक्षणासाठी तीन बालके संस्थेत दाखल आहेत. तसेच बाल न्याय मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या आदेशान्वये विधिसंघर्षग्रस्त बालकांनाही संस्थेत दाखल करण्यात येते.
दीपावली सणाचा आनंद संस्थेतील बालकांसोबत साजरा करता यावा, त्यांचा उत्साह वाढावा आणि त्यांना समाजातील मान्यवर व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संस्थेतून कुटुंबात पुनर्वसन झालेल्या माजी प्रवेशितांचाही सहभाग असणार आहे. कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या कार्याची व बालकांच्या पुनर्वसन प्रक्रियेची माहिती देण्यात येणार असून, बालकांशी हितगुज, अनुभवांची देवाणघेवाण आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
