वसुबारस दिनी गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करा – प्रसन्ना देसाई यांचे आवाहन
गोमातेचे पूजन, गोपालन आणि गोवंश संवर्धनातून भारतीय संस्कृतीची परंपरा जपण्याचे आवाहन
वेंगुर्ले
भारतीय संस्कृतीमध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व असून, दिवाळीच्या प्रारंभी साजऱ्या होणाऱ्या वसुबारस सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी प्रत्येकाने गोमातेचे विधिवत पूजन करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने ३० सप्टेंबर २०२४ रोजी देशी गाईला ‘गोमाता-राज्यमाता’ असा दर्जा दिला आहे. भारतीय संस्कृतीत गाईला पूजनीय मानले जाते. शेती, दुग्धव्यवसाय, सेंद्रिय खतनिर्मिती आणि पर्यावरण संवर्धनामध्ये गोवंशाचे मोठे योगदान आहे. पूर्वी गोधन हे सुखी आणि समृद्ध जीवनाचे प्रतीक मानले जात असे.
बदलत्या जीवनशैलीमुळे गोपालनाची परंपरा हळूहळू कमी होत असताना गोमातेचे महत्त्व आणि गोवंश संवर्धनाची गरज समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. वसुबारसच्या दिवशी गोमातेचे पूजन करून तिला ओवाळावे, गाय व वासराला गोडधोड खाऊ घालावे आणि गोपालन करणाऱ्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.
तसेच परिसरातील गोशाळांना भेट देऊन गोसंवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना प्रोत्साहन द्यावे. गोपालन आणि देशी गोवंश संवर्धनासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यावे.
वसुबारस हा केवळ सण न राहता गोमातेप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ठरावा. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ५ नोव्हेंबर रोजी वसुबारस सणानिमित्त गोमातेचे पूजन करून ही संस्कृती आणि परंपरा जपावी, असे आवाहन प्रसन्ना देसाई यांनी केले आहे.
