दोडामार्ग तालुक्यातही भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्याचा मानस; सिंधुदुर्गातील युवकांच्या कला, क्रीडा व कौशल्यांना अधिकाधिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा विशाल परब यांचा निर्धार
सावंतवाडी : सिंधुदुर्गातील युवकांच्या कला, क्रीडा आणि कौशल्याला वाव देण्यासाठी अधिकाधिक व्यासपीठे उभारणार असून, आगामी काळात दोडामार्ग तालुक्यातही भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस आहे, अशी भूमिका भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांनी मांडली.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सावंतवाडी मतदारसंघाचा विकासात्मक चेहरामोहरा बदलण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करतानाच, ‘भाजपा श्री २०२६’च्या व्यासपीठावर त्यांनी आपल्या वक्तृत्वाचा अनोखा जलवा दाखविला. तब्बल नऊ मिनिटांच्या भाषणात ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्यावरील मिश्किल भाष्याने उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला, तर टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने आणि भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून जगन्नाथराव भोसले शिव उद्यानात ‘भाजपा श्री २०२६’ या भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शरीरसौष्ठवाच्या मैदानात शरीरसाधकांनी आपल्या पीळदार बाहूंचे सामर्थ्य दाखविले, स्नायूंच्या पिळदार रेषांनी उपस्थितांची मने जिंकली; मात्र याच व्यासपीठावर शब्दांचे चौकार-षटकार ठोकत विशाल परब यांनीही आपल्या वक्तृत्वाचा वेगळाच ठसा उमटविला.
सामान्यतः इतरांना अधिकाधिक बोलण्याची आणि स्वतःपेक्षा इतरांना महत्त्व देण्याची भूमिका घेणारे विशाल परब एखाद्या व्यासपीठावर अवघ्या दोन-तीन मिनिटांत आपले मनोगत व्यक्त करून थांबतात. मात्र, यावेळी त्यांनी तब्बल नऊ मिनिटे आपल्या खास शैलीत उपस्थितांशी संवाद साधला. त्यांच्या प्रत्येक वाक्यात आत्मविश्वास, प्रत्येक शब्दात कार्यकर्तृत्वाची जाणीव, तर प्रत्येक विधानात अचूक टायमिंग आणि राजकीय परिपक्वतेची झलक दिसून आली. वरिष्ठांचा आदर, सहकाऱ्यांचा सन्मान आणि युवा पिढीसाठी काहीतरी नवे करण्याची धडपड अशा अनेक पैलूंनी त्यांच्या भाषणाला वेगळीच उंची प्राप्त झाली.
भाषणातील सर्वाधिक रंगतदार क्षण ठरला तो भाजपाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ यांच्या उल्लेखाचा. निवेदकांनी विनोद राऊळ यांची तुलना ‘गदर’ चित्रपटातील सनी देओल यांच्या दमदार भूमिकेशी करत ‘एक घाव दोन तुकडे’ असा उल्लेख केला होता. हाच धागा पकडत विशाल परब यांनी आपल्या खास मिश्किल शैलीत भन्नाट फटकेबाजी केली.
“सन्माननीय निवेदकांना आणि उपस्थित बंधू-भगिनींना मी सांगू इच्छितो की, विनोद राऊळ साहेब म्हणजे एक घाव दोन तुकडे करणारे नव्हेत, तर तब्बल ४५ तुकडे करण्याची ताकद असलेले नेते आहेत! त्यांच्या आशीर्वादाचा आणि आमच्या पाठीवर असलेल्या हाताचा आधार आम्हाला भल्याभल्यांना समोरासमोर भिडण्याचे बळ देतो,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उसळला, तर टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यानंतर विशाल परब यांनी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांचाही आपल्या खास शैलीत उल्लेख केला. ‘नायक’ चित्रपटातील अनिल कपूर यांच्या भूमिकेचा संदर्भ देत त्यांनी निरवडेकर यांच्याकडून सावंतवाडीच्या विकासाबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या.
