You are currently viewing फूल मार्केट विक्रेत्यांची गैरसोय दूर होणार; वाघ पाणंद येथे स्वच्छतागृहाची सुविधा!

फूल मार्केट विक्रेत्यांची गैरसोय दूर होणार; वाघ पाणंद येथे स्वच्छतागृहाची सुविधा!

नगराध्यक्षा श्रद्धा लखमराजे भोसले यांच्या सूचनेनुसार नगरपरिषदेचा निर्णय; विक्रेत्यांना दिलासा, स्वच्छतेला प्राधान्य!

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद क्षेत्रातील फूल मार्केटमधील विक्रेत्यांची दीर्घकाळापासूनची मागणी लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. फूल मार्केटमधील विक्रेत्यांची गैरसोय दूर करण्यासाठी तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता व आरोग्य अबाधित राखण्यासाठी वाघ पाणंद येथे लवकरच स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नगराध्यक्षा श्रीम. श्रद्धा लखमराजे भोसले यांच्या सूचनेनुसार नगरपरिषद प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, त्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात येत आहे.

फूल मार्केट परिसरात दररोज व्यवसायासाठी येणाऱ्या विक्रेत्यांना स्वच्छतागृहाच्या सुविधेअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. वाघ पाणंद येथे युरिनल सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विक्रेत्यांची ही गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच परिसरातील स्वच्छता राखण्यास आणि सार्वजनिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासही या सुविधेचा फायदा होणार आहे.

नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखमराजे भोसले आणि आरोग्य सभापती श्री. सुधीर आडीवरेकर यांनी सर्व विक्रेते व नागरिकांना नगरपरिषदेतर्फे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या स्वच्छतागृह सुविधेचा योग्य व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. परिसरात कुठेही अस्वच्छता होणार नाही, याची काळजी घ्यावी तसेच सावंतवाडी शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा