गडनदीपात्रात बंधारे उभारण्यासाठी हालचालींना वेग; रेल्वे पुलाशेजारील जागेची पाहणी
कणकवली नगरपंचायत, व्यापारी संघटना आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाचा पुढाकार; पाणीसाठा वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहा हजार वनराई बंधारे उभारण्याचे काम पूर्णत्वाच्या दिशेने सुरू असतानाच आता नदीपात्रातील पाणी अडवून पाणीसाठा वाढवण्यासाठी बंधारे उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शासन स्तरावर या उपक्रमाचे नियोजन सुरू असून सामाजिक संस्था आणि विविध संघटनांकडूनही त्याला पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कणकवली शहरातून वाहणाऱ्या गडनदीपात्रात बंधारे उभारण्यासाठी रेल्वे पुलाशेजारील संभाव्य जागेची पाहणी करण्यात आली.
कणकवली नगरपंचायत, महाराष्ट्र शासन, व्यापारी संघटना आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ यांच्या संयुक्त पुढाकारातून ही पाहणी करण्यात आली. नदीपात्रातील कोणत्या ठिकाणी बंधारे उभारल्यास पाणीसाठा वाढण्यास मदत होईल, याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. योग्य जागेची निवड करून नदीतील पाणी अडवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी तहसीलदार दिशांत देशपांडे, मुख्याधिकारी गौरी पाटील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाचे सचिव संदीप राणे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, रुपेश खाडये, विलास कोरगावकर, रोहन डीचोलकर आणि राजेश शिरवलकर उपस्थित होते.
