*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम लेख*
*हा खेळ विधात्याचा!*
(अनाकलनीय )
देव,
कोणाला काय गिफ्ट देईल सांगता येत नाही.
एखाद्या माणसाला तो इतका गोड समंजस स्वभाव देतो की, नुसते त्या व्यक्तीचे नाव ऐकले की, लोकांना आधार वाटतो. ती व्यक्ती आर्थिक दृष्ट्या श्रीमंत असो की नसो, पण एक विश्वसनीय आधार त्या व्यक्तीकडे इतका असतो की, चुंबकासारखे लोक त्या व्यक्ती कडे आपोआप आकर्षिले जातात.
. एखाद्या माणसाकडे पाहून नेहमी तेच वाटते, की तो एकटा सर्व कसे सांभाळतो, खरंच कौतुक आहे.
भावंडे, आईवडील
कुटुंब
बायको, मूल
नोकरी
समाज
नातीगोती
कुटुंब सांभाळताना आपल्या बायको आणि मुलाला पुरेसा वेळ देणे, सर्वाना एकाच वेळी सांभाळणे, त्यात सदैव हसतमुख राहून योग्य रितीने परिस्थिती हाताळणे.
कधीही
हसतमुख राहून स्वतः हून चौकशी करणार?
काळजी, सुखदु:ख सर्वात सहभागी होणार, म्हणजे या कुटुंबातील एक भाग म्हणूनच,
आपली जबाबदारी म्हणून वागणार अगदी सहजपणे.
बुद्धीमान, कलाकार, निगर्वी, माणुसकी जपणारा, सहज सर्वात मिसळून जाणारा.
देवाने असे व्यक्तिमत्व सर्वानाच दिले तर जगात कुठेच वादविवाद, भांडण, कुरापती, द्वेष, हेवादावा, तिरस्कार, असूया राहणार नाही.
अशी एक व्यक्ती आहे की, ती कधी न रागावता सहजपणे दुसर्यांच्या भावना, दु:ख समजून घेते, स्वतः सहनशीलता ठेवून निर्मळ भावनेने दुसर्यांना मदत करते. स्वतः आनंदी राहून सर्वाना आनंद वाटते.
. देवाने जगात अशा सद्वर्तनीच माणसाना जन्माला घातले तर जगात कुठेच अनाचार घडणार नाही.
सर्व च जणांनी आपली नाती माणुसकीने जपली तर कशाला जगात कोलाहल माजेल.
पण देव खूप हुशार आहे, चतुर आहे बरं का? तो अशाच माणसाची वारंवार परीक्षा घेत असतो, सतत त्याच्यामागे कोणत्याकोणत्या प्रकारचे शुक्लकाष्ट मागे लावून देतो.
सतत त्याला अग्निपरीक्षा द्यायला लावतो. त्याच्या वाटेत सतत काटे पेरलेले असतात, एकामागून एक दु:खाची मालिका लावून देतो, नियती त्याला खेळवत असते, सत्वपरीक्षा पहात असते, आयुष्य
संपेपर्यंत हीच वाताहत चालू असते.
माणसाने सुखाची वाट पहात आयुष्यातल्या खाचाखळगे, कडेकपारी, अन्धारकोठडीतून एखादा प्रकाशाचा किरण कुठेतरी शोधायचा असतो.
“खरं तर देव माणसाकडून काहीच मागत नसतो”.
तो फक्त निर्मिती करत असतो आणि मानव संधीचा फायदा घेत असतो, कधी स्वतः च संकटाचे खड्डे स्वतः च खोदत असतो.
. त्यावेळी असे वाटते, ही सृष्टी कोणत्या कारणात्सव निर्माण झाली हा तर सारा विधात्याचा
खेळ आहे, न संपणारी वादळे, संकटे, ताणतणाव. आपण न मागता माणसाचा जन्म मिळतो, जगण्याचे सुख, समाधान, आनंद, शांतता तर मिळतच नाही. आणि नको असलेले रहाटगाडगे विनाकारण खेचत राहतो, त्यात अर्धी मडकी फुटतात, केलेले कष्ट वाहून जातात. ज्यांना आयुष्य हवे आहे त्यांना सुखाने जगता येत नाही, ज्यांना आयुष्य नको आहे त्यांना यातना, वेदना भोगत जगावे लागत आहे, काय आहे विधात्याचा खेळ?
. जन्म मृत्यू जर त्याच्याच हातात असतो, निर्मिती जर त्याच्या हातातच आहे तर प्रत्येक शिल्प तो सुंदर, सत्शील, सद्वर्तनी का घडवत नाही. आणि कर्मफळ नावाचे एक फळ त्याच्या झोळीत टाकून मृत्यू पर्यंत त्याला ती झोळी घेऊन दारोदर भटकावे लागते. कोणत्याही हव्या, नको असलेल्या प्रसंगाना तोंड द्यावे लागते. मग त्याच्या हातून बरीवाईट कृत्ये घडतात, नाईलाजाने कधी परिस्थितीशी अगतिक होऊन, मग मिळालेले सुंदर आयुष्य शिक्षा म्हणून भोगावे लागते. हा झाला विधात्याचा खेळ, आपण फक्त त्यातल्या सोंगट्या आहोत, इथे, तिथे फेकल्या जाणार्या.
. इतकी वर्ष विचार करुन मानवजन्माचे कोडेच उलगडत नाही, हा सारा आभास आहे, तरी तो प्रत्येक सजीवाला भोगावा लागतोय, कधी सुखाचे, आनंदाचे क्षण येतात, पण तो आनंद फार काळ टिकत नाही, लगेच दु:खाचे सावट पसरत असते. जन्माचा आनंद आणि मृत्यूचे भय घेऊनच माणूस सतत जगत असतो. मग कधी परिस्थिती प्रमाणे त्याच्या हातून प्रमाद घडतात, आणि ते
कर्मभोग म्हणून माथी मारले जाते.
मृत्यूला वयाची मर्यादा नसते.
अगदी भृणावस्थेपासून ते 110 पर्यंत कोणत्याही वेळी तो हजर असतो.
आणि म्हणे मृत्यूनंतरही यातना असतातच, मग जन्ममृत्यूचा फेरा तरी कशासाठी?
सारेच अनाकलनीय आहे?
पृथ्वी तरी एकच का असावी?
जेवढे सजीव तेवढ्या पृथ्वी निर्माण झाल्या तर,
सर्व पृथ्वीवर सद्वर्तनी, सर्वगुणसंपन्न जीव निर्माण झाले तर.
तर कुठेच विनाश होणार नाही!
स्वप्नगन्धा सतीश आम्बेतकर,
आर्टिस्ट.
