१ नोव्हेंबरला बॉडीबिल्डिंग स्पर्धा, तर ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धा; आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर निवेद शेटकर यांची उपस्थिती
सावंतवाडी / (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपावलीनिमित्त भव्य बॉडीबिल्डिंग स्पर्धा तसेच नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बॉडीबिल्डिंग स्पर्धा १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता जगन्नाथराव भोसले उद्यान येथे, तर नरकासुर स्पर्धा ७ नोव्हेंबर २०२६ रोजी शिवरामराजे भोसले पुतळ्याजवळील मोती तलाव येथील अमोल आईस्क्रीमच्या समोर आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ या संकल्पनेतून देशभरात फिटनेसविषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभर सुरू असलेल्या ‘रन फॉर इंडिया’सह विविध उपक्रमांच्या माध्यमातून फिटनेसचा संदेश दिला जात आहे. याच संकल्पनेतून भाजप युवा मोर्चाच्या वतीने सावंतवाडीत भव्य बॉडीबिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे मूळचे गोवा येथील व दुबईस्थित आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर आणि विजेते निवेद शेटकर हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेला क्रीडाप्रेमी आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
या भव्य बॉडीबिल्डिंग स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, तसेच युवा नेते विनोद राऊळ उपस्थित राहणार आहेत.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या दोन्ही स्पर्धांमुळे सावंतवाडीतील युवकांना क्रीडा व फिटनेसकडे प्रोत्साहित करण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळणार आहे. त्यामुळे सावंतवाडीकरांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून युवकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
