You are currently viewing कुडाळच्या अनधिकृत कचरा डेपोविरोधात ग्रामस्थ आक्रमक

कुडाळच्या अनधिकृत कचरा डेपोविरोधात ग्रामस्थ आक्रमक

कुडाळच्या अनधिकृत कचरा डेपोविरोधात ग्रामस्थ आक्रमक

जमीन मालकावर दबाव आणल्याचा संघर्ष समितीचा आरोप; तहसील कार्यालयात कथित एजंटगिरी करणाऱ्यावर कारवाईची मागणी

कुडाळ :

कुडाळ नगरपंचायतीचा अनधिकृत कचरा डेपो हटविण्यासाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपो हटविण्यासाठी कचरा डेपोविरोधी संघर्ष समिती व बाधित ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सोमवारी, ५ ऑक्टोबर रोजी कचरा बाधित ग्रामस्थांच्या बैठकीनंतर जमीन मालकांच्या संमतीने कचरा डेपोकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ व जमीन मालक एकजुटीने ठाम राहिले. याबाबत कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तसेच कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, संघर्ष समितीने केलेल्या आरोपानुसार, संबंधित जमीन मालकांपैकी एक व्यक्ती कुडाळ तहसीलदार कार्यालयात अनधिकृतपणे टेबल लावून एजंट म्हणून काम करत होती. याच पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या अधिकाराचा वापर करून संबंधित जमीन मालकाकडे कचरा टाकण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केल्याचा आरोप समितीने केला आहे.
दबावामुळे संबंधित जमीन मालकाने नगरपंचायतीला कचरा टाकण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ दिल्याचा दावा संघर्ष समितीने केला आहे. त्यानंतर संबंधित व्यक्ती तहसील कार्यालयात पुन्हा कथितपणे एजंटगिरी करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला पकडून तहसीलदारांकडे तक्रार केल्याचे समितीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
तक्रारीनंतर तहसीलदारांनी संबंधित व्यक्तीला तहसील कार्यालयात बसू नये, असे बजावत तेथून हटविल्याचा दावा समितीने केला आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी आणि अनधिकृत कचरा डेपो तातडीने हटवावा, अशी मागणी कचरा डेपो बाधित ग्रामस्थ व संघर्ष समितीने केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा