म्हैसूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय कॅम्पमध्ये कोकणाचे करणार प्रतिनिधित्व; महाराष्ट्रातील निवडक २५ युवा प्रतिनिधींमध्ये समावेश
मालवण :
मालवणच्या अॅड. ऐश्वर्य मांजरेकर यांची कर्नाटकातील म्हैसूर येथे आयोजित ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी युवा प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. या निवडीमुळे त्यांना कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असून, संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झालेल्या एकूण २५ युवा प्रतिनिधींमध्ये त्यांचा समावेश आहे.
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या ‘माय युवा भारत’ या स्वायत्त संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत बीएसएनएल रिजनल टेलिकॉम ट्रेनिंग सेंटर, म्हैसूर (कर्नाटक) येथे या राष्ट्रीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात महाराष्ट्र, गोवा, केरळ, तमिळनाडू, मणिपूर आणि राजस्थान या सहा राज्यांतील निवडक युवा प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
अॅड. मांजरेकर या कुडाळ येथील ‘व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज’मध्ये एलएल.एम. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी आहेत. कायद्याचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी सामाजिक कार्य, युवकांचे संघटन, पर्यावरण संवर्धन आणि जनहिताच्या उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
या कॅम्पच्या माध्यमातून विविध राज्यांतील युवकांना एकत्र आणून सामाजिक व राष्ट्रीय विषयांवर चर्चा करण्याची, विचारांची देवाणघेवाण करण्याची आणि नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी मिळणार आहे. मालवणसारख्या कोकणातील शहरातून कायदेविषयक शिक्षण घेणाऱ्या युवतीची राष्ट्रीय स्तरावर निवड होणे, ही कोकणातील इतर युवकांसाठीही प्रेरणादायी बाब मानली जात आहे.
‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’मध्ये कोकणाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल अॅड. ऐश्वर्य मांजरेकर यांचे मित्रपरिवार, कायदे क्षेत्रातील सहकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि सिंधुदुर्गवासीयांकडून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
