You are currently viewing मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानचे चतुर्थ साहित्य संमेलन एक अवर्णनीय सोहळा

मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानचे चतुर्थ साहित्य संमेलन एक अवर्णनीय सोहळा

ठाणे:

साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिकांचा आनंद सोहळा जणू साहित्याची वारीच..! असाच आगळावेगळा अनुभव नौपाडा, ठाणे येथे पार पडलेल्या मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित चतुर्थ साहित्य संमेलनात आला. राज्यभरातून आलेल्या अनेक साहित्यिकांच्या उपस्थितीत अवर्णनीय असा हा साहित्य सोहळा पार पडला आणि या सोहळ्याचा आनंद घेत प्रत्येकजण शेवटच्या क्षणापर्यंत सभागृहात खिळून राहिला हे विशेष. मनस्पर्शीच्या साहित्य वारीची सुरुवात थंडगार एसी हॉल, मोगऱ्याचा मंद सुगंध आणि अध्यक्षा मानसी पंडित यांच्या हसतमुख स्वागताने आणि प्रास्ताविकाने झाली. यावेळी मनस्पर्शीच्या सल्लागार सदस्या दिवंगत ज्येष्ठ साहित्यिका निलांबरी गानू यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सोहळ्याचे प्रमुख मान्यवर उद्घाटक गझलकार डॉ राजेंद्र केंगार, संमेलनाध्यक्ष गझलकार डॉ. सुधाकर बेंद्रे, गझल मुशायरा अध्यक्ष गझलकार रवींद्र देशमुख, कवी संमेलन अध्यक्ष गझलकार डॉ.सुभाष कटकदौंड, गझलकार किरण वेताळ, स्वागताध्यक्ष दीपाली घाटगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.

संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या डॉ.मानसी पाटील यांनी आपल्या सुमधुर आवाजात स्वलिखित संस्थेचे शीर्षक गीत सादर करताच संमेलनाला वेगळाच रंग चढला. खजिनदार निखिल कोलते यांनी संस्थेने वर्षभर केलेल्या कामांचे, उपक्रम, स्पर्धा आदींचा थोडक्यात आढावा घेऊन संस्थेची ध्येय धोरणे विषद केली. सन्मानचिन्ह व तुळशीचे रोप देऊन उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत करून मान्यवरांचा थोडक्यात परिचय करून देण्यात आला. स्वागतानंतर मान्यवरांची बोधपर मनोगते आणि मान्यवरांच्या गझल सादरीकरणानंतर उद्घाटन समारंभ संपल्याचे जाहीर केले.

 

*अंतर्मनात रेंगाळणाऱ्या गझलांचे सादरीकरण*

 

संमेलनाच्या पहिल्या सत्रात निमंत्रित गझलकारांचा गझल मुशायरा संमेलनाला वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला. यामध्ये गझलकार माधुरी बर्वे, ज्योती देशपांडे, दीपक पटेकर, दीपाली घाटगे, सीमा झुंझारराव, डॉ. सुभाष कटकदौंड, डॉ. राजेंद्र केंगार, शबाना मुल्ला, डॉ मानसी पाटील आदींनी भाग घेतला. गझल मुशायराचे अध्यक्ष गझलकार रवींद्र देशमुख यांनीही गझला सादर करून उत्तम मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केलं. गझलकार किरण वेताळ यांनी बहारदार सूत्रसंचालनात गझलांचा वेगवेगळ्या शेरांची बरसात करून गझल मुशायरा रंगतदार बनवला. गझल मुशायरामध्ये सहभागी गझलकारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह, ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले.

 

*पुस्तक प्रकाशन सोहळा जणू कृतज्ञता सोहळाच..!*

 

“मन मनास उमगत नाही” या मनाचा प्रवास शब्दातून मांडणाऱ्या लेख असलेल्या संस्थेच्या अध्यक्षा मानसी पंडित आणि “तुफानातील दिवे” या खजिनदार निखिल कोलते यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाचा सोहळा जणू कृतज्ञता सोहळा ठरला. निखिलचे दुसरे पुस्तक आणि मानसीचे हे पहिलेच पुस्तक प्रकाशन असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखेच होते. निखिलचे कुटुंबीय तसेच मानसी पंडित यांच्या कुटुंबीयांसह अनेक नातेवाईक या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे साक्षीदार बनले. काहींनी आपल्या मनोगतातून सोहळ्याचा आनंद व्यक्त केला तर काहींनी आपल्या भरल्या डोळ्यांनीच प्रत्येक क्षण अवर्णनीय असल्याचे दाखवून दिले. यावेळी संपदा देशपांडे, शब्दांवय प्रकाशनचे प्रभाकर पवार आदींनी पुस्तकांवर भाष्य केले. संमेलनाध्यक्ष गझलकार सुधाकर बेंद्रे यांनी दोन्ही पुस्तकांचे विशेष कौतुक केले. या प्रसंगी ज्यांनी मोलाची साथ दिली, आशीर्वाद, पाठिंबा दिला त्या सर्वांचे मानसी व निखिल यांनी सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली.

 

*पुरस्कार आणि सन्मान कवीमनाला प्रेरणा देऊन गेले*

 

मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान दरवर्षी मासिक, पाक्षिक, साप्ताहिक स्तंभलेखन पद्य व गद्य उपक्रम राबविते. त्याचबरोबर अनेक स्पर्धा देखील संस्थेकडून घेण्यात येतात. इतर साहित्य समूह ऑनलाईन प्रमाणपत्रे देऊन मोकळे होतात. परंतु मनस्पर्शी साहित्य समूह प्रत्येक स्पर्धेत विजेत्या साहित्यिकांचा साहित्यसंमेलनाचे औचित्य साधून सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करतो. यावेळी वर्षभर स्तंभलेखन करणाऱ्या साहित्यिकांकडून सातत्यपूर्ण उल्लेखनीय पद्य व गद्य लेखन करणाऱ्या साहित्यिकांना सर्वोत्कृष्ट स्तंभलेखन पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. तसेच साहित्य संमेलनात आणि संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये, उपक्रमांमध्ये सहकार्य करणाऱ्या गुणीजनांचा देखील सन्मान केला जातो. संस्थेची ध्येय आणि धोरणे हीच साहित्यिकांना प्रेरणा देणे, नवनवीन साहित्य निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणे हीच असल्याने आपल्या कार्यातून संस्थेचे पदाधिकारी आणि समिती याचा प्रत्यय आणून देतात. असाच सन्मान मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन चतुर्थ साहित्य संमेलनात स्तंभलेखन आणि वार्षिक स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या साहित्यिकांचा केला गेला.

 

*कवींनी उधळले काव्यरंग…*

 

मराठी भाषेवर प्रेम करणारे अनेक कवी, गझलकार महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही मनस्पर्शीच्या साहित्य संमेलनात सहभागी झाले होते. नवोदितांपासून दिग्गज कवी कवयित्रीनी आपल्या एकापेक्षा एक सरस, बहारदार काव्यरचना सादर करून कविसंमेलनात रंगत आणली. जवळपास दोन तास कवी कवयित्री रसिक श्रोत्यांना खुर्चीवर खिळवून ठेवले होते. कविजनांच्या रचनांना श्रोतेही उत्स्फूर्त अशी दाद देत होते. त्यामुळे सादरीकरणात चैतन्य येत होते.

 

सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू..?

उमलते अंगांग माझे..आणि तू मिटलास का रे..?

सुरेश भटांच्या गझलेतील शेराप्रमाणेच प्रश्न उपस्थित करून मनस्पर्शीच्या अध्यक्षा मानसी पंडित यांनी मान्यवर आणि उपस्थित साहित्यिकांचे आभार व्यक्त करून पसायदानाने साहित्य संमेलन सोहळ्याचा समारोप केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा