You are currently viewing कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साकव्य विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम लेख*

 

*कोजागिरी पौर्णिमा*

 

*को जागर्ती महाभागे चेतसा कौतुकान्विता !*

*ततस्मैवित्तन् प्रयछ्यामि गां रत्नं च सर्वदा.!*

 

भारतीय हिंदू संस्कृतीतील सण, उत्सव परंपरेतील धार्मिक, तसेच आध्यात्मिक परंपरेत बहुअंशी प्रत्येक महिन्यामध्ये धार्मिक, व्रतवैकल्ये, पूजापाठ, श्रद्धेने करण्याचा प्रघात अनादीकालापासून आहे हे आपण जाणतो आहोत आणि ते सर्वश्रुत देखील आहे.

आता नुकताच नवरात्री आणि दसरा (विजया दशमी) हा उत्सव झाला आणि लगेचच ही पौर्णिमा आली.

*ती पौर्णिमा म्हणजे अश्विन शुद्ध कोजागिरी पौर्णिमा. हिला शारदीय पौर्णिमा असे म्हटले जाते आणि या पौर्णिमेला भारतीय हिंदू संस्कृतीत विशेष महत्त्व आहे.*

या शारदीय पौर्णिमेच्या दिवशी प्रत्यक्षात अगदी साक्षात महालक्ष्मी देवी ही चंद्रमंडळातून अवनीवरती म्हणजेच पृथ्वीवर अवतरते आणि ‘*को जागरती, को जागरती’ म्हणजे पृथ्वीवर कोण जागे आहे? सतर्क आहे, सजग आहे? ही मानव प्रकृती काय करीत आहे, हे पाहण्यासाठी पृथ्वीवर संचार करीत असते.*

म्हणूनच कोजागिरीच्या दिवशी सर्वजण जागरण करतात, अशी मनाची धारणा आहे.

*अश्विन शुद्ध शारदीय पौर्णिमेच्या दिवशी चंद्रमा हा पृथ्वीच्या अगदी निकट म्हणजे जवळ असतो असे म्हटले जाते.*

त्या वातावरणाचा मानवी प्रकृतीवर खूप चांगला , सर्वार्थाने सुदृढ असा शारीरिक आणि मानसिक, उल्हासदायी परिणाम होतो असेही मानले जाते. *म्हणून या दिवशी श्रद्धेने कोजागिरीचे व्रत करण्याची प्रथा आहे.*

दिवसा उपवास करून रात्रीच्या प्रहरी “*महालक्ष्मी तसेच ऐरावतावर म्हणजे हत्तीवर आसनस्थ झालेल्या इंद्रदेवाची यथासांग पूजा करावी.*

ती करताना खालील मंत्र म्हणावा:

 

“*या सा पद्मासनस्था विपुलकरितरी पदमपत्रायताक्षी।।*

*गंभीरावर्तनभिस्तनभर नमिता शुभ्रवस्त्रोत्तरिया ।।”*

 

आणि नंतर रात्री पौर्णिमेच्या चंद्रमाला केशर, बदाम, पिस्ता मिश्रित आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा. आपल्या सर्व सहोदर, नातेवाईक, मित्रमंडळींच्या सोबत त्याचे प्राशन करीत, त्या दुधाचा आस्वाद घेत उत्तररात्रीपर्यंत जागरण करावे, अशी पारंपरिक प्रथा आहे.

कोजागिरीच्या अनेक कथा आहेत, त्या पौराणिक कथेतून आपल्याला वाचायला मिळतात. *या कोजागिरी दिवशी “को जागर, को जागर” म्हणजे कोण जागे आहे? कोण जागे आहे? असे म्हणत लक्ष्मी माता चांदण्यांच्या प्रकाशात अमृतकलश घेऊन फिरत असते. जिथे लोक जागी आहेत, जिथे लोक जागृत आहेत, तिथे ती थांबते, स्थिरावते आणि कृपावंत होते अशी श्रद्धा आहे.*

म्हणून कोजागिरीला सर्वांनी जागरण करण्याची प्रथा आहे. हे कोजागिरीचे व्रत केल्याने कुटुंबात सुबत्ता, धन, धान्य, तृप्ती, समाधान लाभून ऐश्वर्य प्राप्त होते आहे असे मानले जाते.

या दिवशी कुटुंबातील ज्येष्ठ ( मोठ्या) अपत्याला ओवाळून, त्याला नवीन कपडे देऊन ‘अश्विनी’ साजरी करण्याची प्रथा आहे.

 

*पौराणिक कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताची सनतकुमार संहितेमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. या पौर्णिमेच्या दिवशी ‘कौमुदी महोत्सव’ साजरा केला जातो. शरद ऋतूतील या पौर्णिमेला शारदीय पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा असे संबोधले जाते.*

 

काही लोक आपल्या पारंपरिक प्रथेप्रमाणे संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर आपल्या घरात, परिसरात, मंदिरात लक्ष दिवे लावून पूजा करतात. दुग्धपान करून आणि भजन, गाणी म्हणून जागरण करीत उत्साहाने ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात.

कोजागिरी पूजा मंत्र खालीलप्रमाणे म्हणावा:

 

‘ *पुत्रपौत्रं धनं धान्यम हस्तश्वादिग्वेरथम प्रजानां भवसि माता आयुष्यनतं करोतु मे।’*

‘ *ऊं यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये, धनधान्य समृद्धी मे देहि दापय स्वाहा:।।’*

 

*इती लेखन सीमा*

——————————

*©️ वि. ग. सातपुते.*

” *अध्यक्ष: महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे (महाराष्ट्र)*

📞: *9766544908*

प्रतिक्रिया व्यक्त करा