*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित कोजागिरी पौर्णिमे निमित्त अप्रतिम गझल*
*धुंद पौर्णिमा*
(वृत्त : अनलज्वाला)
अजूनही खुणावते उरात धुंद पौर्णिमा
इथे तिथे सळाळते मनात धुंद पौर्णिमा
कितीक चंद्र भोगले तुझ्यासवे सखी इथे
थरारते तळ्यातल्या जळात धुंद पौर्णिमा
हळूच मंद वात तो नभास काय सांगतो
तुझ्यामुळे फुलारली वनात धुंद पौर्णिमा
क्षिरात बिंब पाहतो सखी तुझे अजूनही
पहा कशी डहूळते दुधात धुंद पौर्णिमा
पहाट वाट दावते दंवात हासती फुले
उफाळते अजूनही तनात धुंद पौर्णिमा
श्रीनिवास गडकरी.
बावधन पुणे
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित
25.10.2026
