You are currently viewing सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर; ‘EX-INS गुलदार’

सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर; ‘EX-INS गुलदार’

सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर; ‘EX-INS गुलदार’

प्रकल्पाला प्रतिष्ठित गोल्डन बनियन पुरस्कारासाठी निवड

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी पर्यटनाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) ‘EX-INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशियल रीफ अँड सबमरीन टुरिझम प्रोजेक्ट’ची प्रतिष्ठित ‘गोल्डन बनियन अवॉर्ड’साठी निवड झाली आहे. ‘द वीक हेरिटेज अवॉर्ड्स २०२६’ अंतर्गत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘बेस्ट इनोव्हेशन/प्रॉडक्ट’ आणि ‘बेस्ट क्रिएटिव्ह/कॅम्पेन’ या दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. या पुरस्कारासाठी झालेली निवड ही सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वाची उपलब्धी असून, जिल्ह्याच्या सागरी पर्यटन क्षमतेवर राष्ट्रीय स्तरावर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे.

भारतीय नौदलात ३८ वर्षे गौरवशाली सेवा बजावल्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये निवृत्त झालेल्या ‘आयएनएस गुलदार’ या युद्धनौकेच्या माध्यमातून निवती रॉक्स परिसरात हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प साकारण्यात येत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय नौदल यांच्या संयुक्त विद्यमाने, केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने सुमारे ४६.९१ कोटी रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. युद्धनौकेला समुद्राच्या तळाशी नियंत्रित पद्धतीने स्थिर करून पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळभित्ती विकसित करण्याची या प्रकल्पाची संकल्पना आहे. स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि पाण्याखालील पर्यटनाचा अनोखा अनुभव उपलब्ध करून देण्याबरोबरच सागरी जैवविविधतेच्या संवर्धनालाही या प्रकल्पातून चालना मिळणार आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य’ (SASCI) योजनेंतर्गत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रगती अहवालानुसार, प्रकल्प ३१ मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच्या दहा वर्षांत सुमारे ८०० प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या माध्यमातून सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील साहसी आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक व्यावसायिक, पर्यटन सेवा पुरवठादार आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

‘द वीक हेरिटेज अवॉर्ड्स २०२६’चा पुरस्कार वितरण सोहळा २७ ऑक्टोबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रित केले असून, प्रकल्पाच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सहकार्याचीही दखल घेण्यात आली आहे. सिंधुदुर्गच्या नैसर्गिक सागरी संपदेला आधुनिक पर्यटन संकल्पनेची जोड देणारा ‘EX-INS गुलदार’ प्रकल्प कोकणच्या पर्यटन विकासासाठी महत्त्वाचा ठरणार असून, या पुरस्कारासाठी झालेल्या निवडीमुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा