You are currently viewing न्यू इंग्लिश स्कूल ओसरगाव-बोर्डवेच्या नवीन इमारतीसाठी घोरपडे दाम्पत्याकडून २१ हजारांची देणगी

न्यू इंग्लिश स्कूल ओसरगाव-बोर्डवेच्या नवीन इमारतीसाठी घोरपडे दाम्पत्याकडून २१ हजारांची देणगी

न्यू इंग्लिश स्कूल ओसरगाव-बोर्डवेच्या नवीन इमारतीसाठी घोरपडे दाम्पत्याकडून २१ हजारांची देणगी

नातू राघव घोरपडे याच्या नावाने शाळेला आर्थिक मदत; सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी विश्वनाथ मोरे यांच्याकडूनही ५ हजारांची देणगी

ओसरगाव :

न्यू इंग्लिश स्कूल ओसरगाव-बोर्डवे या विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी ओसरगाव येथील सेवानिवृत्त शिक्षिका सौ. सुप्रिया घोरपडे व घोरपडे सर यांनी आपल्या लाडक्या नातू कु. राघव स्वप्निल घोरपडे याच्या नावाने २१ हजार रुपयांची देणगी दिली. शिक्षणाप्रती असलेली बांधिलकी आणि शाळेच्या विकासासाठी दाखविलेल्या दातृत्वाबद्दल घोरपडे दाम्पत्याचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी कसाल शिक्षण संस्थेचे बोर्डवे संचालक श्री. सखाराम येनडे, ओसरगाव संचालक श्री. चंद्रहास ऊर्फ बबली राणे तसेच हायस्कूलचे सदस्य श्री. नाथा परब उपस्थित होते.
विद्यालयाची जुनी इमारत अनेक वर्षांपासून वापरात असल्याने वारंवार दुरुस्ती करावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन संस्थेच्या वतीने नवीन पाच वर्गखोल्या बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या बांधकामासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत घोरपडे दाम्पत्याने २१ हजार रुपयांची देणगी देऊन शाळेच्या विकासकार्यात मोलाचा हातभार लावला.
तसेच गवळवाडी येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी श्री. विश्वनाथ मोरे यांनीही शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी ५ हजार रुपयांची रोख देणगी दिली.
शाळेच्या उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या घोरपडे दाम्पत्याचे आणि विश्वनाथ मोरे यांचे कसाल शिक्षण संस्थेच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या दातृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा