वेंगुर्ले येथील आजगांवकर पितापुत्रांचे नेमबाज स्पर्धेत यश, दोघांचीही नॅशनल स्पर्धेसाठी निवड..
वेंगुर्ले
महाराष्ट्र रायफल असोसिएशन तर्फे २८ वी कॅप्टन एस. जे. इझेकियल स्मृती महाराष्ट्र राज्य नेमबाज अजिक्यपद स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये वेंगुर्ला येथील दत्तप्रसाद निळकंठ आजगांवकर आणि कु. गौरव दत्तप्रसाद आजगांवकर या पितापुत्रांनी उज्ज्वल यश संपादन केले. या दोघांची प्रि नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, कोल्हापूर, सातारा, धुळे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, रत्नागिरी, सिधुदुर्ग येथील नेमबाजांनी सहभाग घेतला होता. वेंगुर्ला येथील दत्तप्रसाद आजगांवकर यांनी ५० मीटर ०.२२ पीप साईड रायफल प्रोन प्रकारात ६०० पैकी ५३८ गुण प्राप्त करीत राज्यात आठवी रँक प्राप्त केली. तर गौरव आजगांवकर याने १० मीटर पीप साईट एअर रायफल प्रकारात ४०० पैकी ३८१ गुणांसह राज्यात दहावी रँक प्राप्त केली. या दोघांना प्रशिक्षक अरूण वारेशी (मुंबई) व कांचन उपरकर (वेंगुर्ला) यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले, जिल्हा क्रीडा कार्यालय ओरोस तसेच सिधुदुर्ग जिल्हा शुटींग असोसिएशनच्या सर्व पदाधिका-यांनी अभिनंदन केले.