You are currently viewing वकिलांनी देशहिताला प्राधान्य द्यावे! – ॲड. सतिश गोरडे

वकिलांनी देशहिताला प्राधान्य द्यावे! – ॲड. सतिश गोरडे

वकिलांनी देशहिताला प्राधान्य द्यावे! – ॲड. सतिश गोरडे

सनदप्राप्त वकिलांचा सत्कार सोहळा संपन्न

पिंपरी (दिनांक : २४ ऑक्टोबर २०२६)

‘श्रद्धेय अशोकजी सिंघल यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन नवोदित वकिलांनी देशहिताला प्राधान्य द्यावे!’ असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ आणि विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी क्रांतितीर्थ, क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय, चिंचवडगाव येथे शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी केले. विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक श्रद्धेय अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अधिवक्ता स्नेहसंमेलनात वकिलीची सनद प्राप्त केलेल्या नवनियुक्त वकिलांना मार्गदर्शन करताना ॲड. सतिश गोरडे बोलत होते. विश्व हिंदू परिषद, विधी प्रकोष्ठ प्रांत संयोजक ॲड. शैलेश भावसार, विधी प्रकोष्ठ प्रांत संचालक ॲड. संकेत राव, ॲड. खेताराम सोलंकी, ॲड. आशिष गोरडे व ॲड. सुशांत गोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अशोक सिंघल यांचे प्रेरणादायी चरित्र आणि जीवनकार्याची विस्तृत माहिती देऊन ॲड. सतिश गोरडे पुढे म्हणाले की, ‘विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपासून धर्मांतर, हिंदूंचे एकत्रीकरण आणि सबलीकरण यासाठी असंख्य अभियान आणि उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सात वर्षांपूर्वी विधी प्रकोष्ठची स्थापना करण्यात आली. अशोक सिंघल यांनी संत – महंत आणि विविध हिंदू संघटनांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी प्रयत्न केले. हिंदू समाजातील सामाजिक समरसता आणि एकात्मता वाढवण्यावर भर देत धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या संघटनासाठी आयुष्यभर कार्य केले. अशोक सिंघल हे गो, गंगा, गीता आणि गायत्रीचे उपासक होते. वेद आणि संस्कृत भाषेचा प्रचार त्यांनी केला. आगामी काळात विश्व हिंदू परिषदेचे संघटनात्मक कार्य अधिक वाढवून महिला सबलीकरण, हिंदू सुरक्षा, गोरक्षण, धर्मांतर थांबविणे, समरसता भाव सदृढ करणे या सर्व कार्याला गती देणार आहोत आणि हीच खऱ्या अर्थाने स्वर्गीय अशोक सिंघल यांना श्रद्धांजली ठरेल. पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावातून भारतात ढासळू पाहणारी कुटुंबव्यवस्था पुन:स्थापित करणे, समुपदेशनातून घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार या समस्यांचे निराकरण करणे, हिंदुत्वावरील आघात रोखून विधिवत मार्गाने त्यांना प्रतिबंध घालणे, नवोदित वकिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांच्यावर नीतिमूल्यांचे संस्कार करणे अशा विविध पातळीवर विधी प्रकोष्ठ कार्यरत आहे. सनदप्राप्त नवनियुक्त वकिलांनी आपला व्यवसाय करतानाच हिंदूसमाज आणि देशहित जोपासावे!’ ॲड. शैलेश भावसार यांनी, ‘मोजक्याच काही अपप्रवृत्ती अन् गैरप्रकारांमुळे वकिली व्यवसाय काहीसा कलंकित झाला आहे. ‘धर्म रक्षति रक्षत:’ या सुभाषितानुसार क्रांतिवीर चापेकरबंधूंच्या त्यागाचे ज्वलंत उदाहरण डोळ्यासमोर ठेवून नवोदित वकिलांनी नि:स्वार्थ अन् प्रामाणिकपणे व्यवसाय केल्यास आपोआप यश, कीर्ती प्राप्त होईल!’ असे प्रतिपादन केले. याप्रसंगी वकिली सनदप्राप्त दीपाली पांडव, अश्विनी साळुंखे, हर्षिता शर्मा, तुषार लाडके या नवोदित वकिलांचा ‘आपले संविधान’ हा ग्रंथ प्रदान करून प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. ॲड. संकेत राव यांनी प्रास्ताविक केले. क्रांतितीर्थचे व्यवस्थापक अतुल आडे, रोहित शिंदे, हर्षदा धुमाळ, प्राजक्ता कदम यांनी संयोजनात सहकार्य केले. ॲड. खेताराम सोलंकी यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा