You are currently viewing वझरेतील ‘आंगण’ प्रकल्पात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; घातपाताचा संशय!

वझरेतील ‘आंगण’ प्रकल्पात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; घातपाताचा संशय!

मोहन गवस यांच्या शरीरावर जखमा आढळल्याने नातेवाइकांकडून संशय व्यक्त

मृतदेह रुग्णालयात नेल्याबाबत प्रश्न; बाबुराव धुरी, संदीप गवस यांची घटनास्थळी भेट, पोलिसांकडून तपास सुरू

दोडामार्ग / (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील वझरे येथील ‘आंगण’ प्रकल्पात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मोहन वासुदेव गवस (वय ६५, रा. कसई, गावठणवाडी) यांचा गुरुवारी उघडकीस आलेल्या घटनेत कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या शरीरावर जखमा आढळल्याने नातेवाइकांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून, घातपाताची शक्यताही वर्तवली आहे.

मोहन गवस हे ‘आंगण’ प्रकल्पात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूनंतर शरीरावरील जखमांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जखमा कशामुळे झाल्या, मृत्यूपूर्वी काय घडले आणि घटनेमागील नेमके कारण काय, याची चौकशी करण्याची मागणी नातेवाइकांकडून करण्यात येत आहे.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्याबाबतही नातेवाइकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मृतदेह रुग्णालयात हलविण्याचा निर्णय कोणी घेतला आणि नातेवाइकांना वेळेत माहिती का देण्यात आली नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मृत्यूचे कारण, शरीरावरील जखमा आणि नातेवाइकांनी व्यक्त केलेल्या संशयाच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर उबाठाचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप गवस यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित प्रशासनाकडे जाब विचारला. या प्रकरणातील सत्य समोर यावे आणि मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट व्हावे, अशी मागणी होत आहे.

मोहन गवस यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असून, पोलिसांच्या तपासानंतरच घटनेचे सत्य स्पष्ट होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा