दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क परतावा करण्यात श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी.
सावंतवाडी
महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश करण्यात आल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीबाबत शासन निर्णय (GR) निर्गमित करून राज्यातील विद्यापीठांना आवश्यक कार्यवाहीसंदर्भात निर्देश दिले. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने तातडीने परिपत्रके जारी करून संलग्न महाविद्यालयांना या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले.
या संपूर्ण प्रक्रियेत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. रविंद्र कुलकर्णी,प्र-कुलगुरू मा.प्राचार्य अजय भामरे, डॉ. पूजा रौंदाळे, डॉ. प्रसाद कारंडे, तसेच विद्यापीठातील इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेले मार्गदर्शन आणि सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले.
या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देत श्री पंचम खेमराज महाविद्यालय (स्वायत्त), सावंतवाडी यांनी परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीची प्रक्रिया प्राधान्याने हाती घेतली. संस्थेचे व्यवस्थापन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, टास्क फोर्सचे सदस्य आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करत या प्रक्रियेत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
महाविद्यालयातील एकूण १,२५६ विद्यार्थ्यांपैकी सुमारे ९० टक्के विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचा परतावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाने स्वतंत्र धनादेश (चेक) देण्यात आले आहेत. यामुळे शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम थेट संबंधित विद्यार्थ्याला मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संस्थेच्या चेअरमन श्रीमंत सौ. शुभदादेवी भोंसले आणि मुंबई विद्यापीठ सिमेंट सदस्य युवराज लखमराजे भोंसले यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले.
परीक्षा शुल्क परतावा प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यासाठी महाविद्यालयाने शासन निर्णय आणि विद्यापीठाच्या परिपत्रकांचा अभ्यास करून नियोजनबद्ध कार्यपद्धती अवलंबली. विद्यार्थ्यांची माहिती संकलित करणे आणि धनादेश वितरणाची कार्यवाही करणे अशा टप्प्यांवर महाविद्यालयातील टास्क फोर्स आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
या संदर्भात मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज लखमराजे भोंसले यांनी शासन, मुंबई विद्यापीठाचे अधिकारी, संस्थेचे व्यवस्थापन, टास्क फोर्सचे सदस्य, कार्यालयीन प्रशासक आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्वांनी दाखविलेली तत्परता, सहकार्य आणि कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. उर्वरित विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही महाविद्यालय प्रयत्नशील राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
