दुर्मिळ ओ निगेटिव्ह रक्तगटासाठी पंढरी सावंत यांचे तातडीने रक्तदान
सांगेलीच्या पंढरी सावंत यांचे १७ वे रक्तदान; ऑन कॉल रक्तदाता संस्थेतर्फे मानाचा मुजरा
सावंतवाडी :
मळगाव (ता. सावंतवाडी) येथील श्रीधर दत्ताराम रेडकर यांच्यासाठी दुर्मिळ अशा ओ निगेटिव्ह रक्तगटाच्या दोन युनिट रक्ताची तातडीने आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेऊन ऑन कॉल रक्तदाता संस्थेचे नियमित रक्तदाते पंढरी सावंत (रा. सांगेली) यांनी २१ ऑक्टोबर रोजी तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (GMC) बांबोळी येथील रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले.
पंढरी सावंत यांचे हे १७ वे रक्तदान असून, यापूर्वीही त्यांनी अनेक वेळा गरजू रुग्णांसाठी ऑन कॉल रक्तदान करून मोलाचे योगदान दिले आहे. दुर्मिळ रक्तगटाची गरज असताना तत्परतेने धावून जात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
त्यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल ऑन कॉल रक्तदाता संस्थेतर्फे पंढरी सावंत यांना मानाचा मुजरा करण्यात आला.
