मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे रक्तदान शिबिर संपन्न!
सावंतवाडी
शनिवार दि. १८ जुलै २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी, सेवाभावी भारतीय संस्था, सावंतवाडी आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले गेले.
राजमातांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी कु. नेहल मठकर व नववीतील विद्यार्थिनी कु. करीष्मा मांजरेकर यांनी राजमातांचा जीवनप्रवास व त्यांचे शैक्षणिक, सामाजिक तसेच कलाक्षेत्रातील कर्तृत्व आपल्या भाषणाद्वारे व्यक्त केले. संस्थेच्या कार्याध्यक्षा हर हायनेस राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोंसले यांनी देखील राजमातांच्या पवित्र स्मृतींना उजाळा दिला. यावेळी व्यासपीठावर सिं. जि. शि. प्र.मंडळाच्या कार्याध्यक्षा हर हायनेस श्रीमंत शुभदादेवी भोंसले, सह संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य डॉ. सतिश सावंत, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एल्.भारमल , मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगांवकर, प्रा. राजेंद्र शिंत्रे , रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. समीर मुल्तानी , सेवाभावी भारतीय संस्थेचे उपाध्यक्ष श्री. गोविंद प्रभू, ऑनकॉल रक्तदाते संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीम. मिनल सावंत, सचिव श्री. बाबली गवंडे, पालक शिक्षक संघ समितीचे प्रतिनिधी प्रा. उमेश म्हसकर , श्रीम.अनिता कदम श्री.जयेश स्वार आदि मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिरामध्ये शिक्षक, पालक आणि नियमित रक्तदात्यांसहित नऊ महिला रक्तदात्या तसेच युवकांनी सुद्धा रक्तदान केले. यावेळी एकूण ३८ रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी दर्शविली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्रीम. श्रृती जोशी यांनी ओघवत्या शैलीत केले तर श्री गोविंद प्रभू यांनी आभार व्यक्त केले. रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, सेवाभावी भारतीय संस्थेच्या सर्व सदस्यांनी त्याचप्रमाणे ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
