बोर्डवेतील वीज समस्यांवर शिवसेना आक्रमक; महावितरणला आंदोलनाचा इशारा
मोडकळीस आलेले वीजखांब बदलणे, स्मार्ट मीटरची तपासणी आणि अवाजवी बिलांचा प्रश्न सोडविण्याची मागणी
कणकवली :
बोर्डवे गावातील वीजपुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांबाबत बोर्डवे शिवसेनेच्या वतीने आज कणकवली येथील महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गावातील वीजसमस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन व निदर्शने करण्यात येतील, असा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थ आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरणला दिला.
यावेळी महावितरणचे अधिकारी भामरे साहेब, कळसुली विभागप्रमुख श्री. चंद्रहास ऊर्फ बबली राणे तसेच बोर्डवे गावातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गावातील वीजपुरवठ्याबाबत वारंवार उद्भवणाऱ्या अडचणी, स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिले येत असल्याच्या तक्रारी आणि वीजबिल भरण्यासाठी होणारी गैरसोय यांसह विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
बोर्डवे गावातील वीजविषयक समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या.
गावातील मोडकळीस आलेले वीजखांब तातडीने बदलण्यात यावेत.
बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरची तपासणी करून वाढीव वीजबिलांच्या तक्रारींची चौकशी करावी आणि योग्यतेनुसार बिलांमध्ये दुरुस्ती करावी.
घरमालकांची संमती आणि ग्रामपंचायतीची परवानगी घेऊनच स्मार्ट मीटर बसविण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
गावातील नागरिकांना वीजबिल भरण्यासाठी होणारी गैरसोय दूर करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
नवीन वीजमीटर बसविण्याची प्रलंबित कामे मार्गी लावावीत.
या मागण्यांबाबत महावितरणने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. गावातील समस्या काही दिवसांत मार्गी न लागल्यास शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या चर्चेत समाजसेवक विशाल येंडे, माजी सदस्य शरद साळवी, विभागप्रमुख चंद्रहास ऊर्फ बबली राणे, निलेश परब, देवा कारेकर, मुकेश मोडक, गणेश कारेकर, हर्षद राठवड, चिन्मय भिसे, सचिन शिंदे आणि विराज येंडे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
