You are currently viewing जिल्ह्यात गुरूवारपासून एफएफएस प्रणालीद्वारे खत विक्री

जिल्ह्यात गुरूवारपासून एफएफएस प्रणालीद्वारे खत विक्री

शेतकऱ्यांना खत बुकिंगची सुविधा; खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता व सुलभता येणार

सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार : शेतकऱ्यांना रासायनिक खतांची खरेदी अधिक सुलभ, पारदर्शक व जलद गतीने करता यावी, या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (Framework for Fertilizer Sale – FFS) ही मोबाईल आधारित प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात येत्या 22 ऑक्टोबर 2026 पासून या प्रणालीद्वारे खत विक्रीची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी एफएफएस (FFS) प्रणालीचा वापर करून खत खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.

जिल्ह्यात एफएफएस (FFS) या प्रणालीद्वारे खत विक्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. सध्या कृषी सेवा केंद्रांवर ई-पॉस (ePOS) मशीनद्वारे खतांची विक्री केली जाते. मात्र, खत खरेदीसाठीचा वेळ वाचावा आणि खत खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ व नियोजनबद्ध व्हावी, यासाठी शासनाने FFS मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे.

या प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरून पिकांच्या गरजेनुसार खतांची शिफारस व अधिकृत विक्रेत्यांकडील उपलब्ध खतसाठ्याची माहिती पाहता येणार आहे. शेतकऱ्यांना जमिनीचे क्षेत्रफळ व पिकांची निवड केल्यानंतर सामान्य खत शिफारस (General Fertilizer Recommendation) उपलब्ध होईल. त्यानुसार आवश्यक खतांचा प्रकार व प्रमाण निवडून जवळच्या खत विक्रेत्याची निवड करता येईल. खत विक्रेत्याची निवड करून बुकिंग सबमिट केल्यानंतर शेतकऱ्यांना युनिक क्यूआर कोड व टोकन क्रमांक प्राप्त होईल. त्याचा वापर करून संबंधित खत विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. FFS प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सर्व अधिकृत खत विक्रेत्यांनी ई-पॉस मशीन सुरू स्थितीत ठेवावे, प्रत्यक्ष खतसाठा व ई-पॉसवरील साठा यामध्ये ताळमेळ ठेवावा आणि नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तयारी पूर्ण करावी, असे सूचित करण्यात आले आहे.

सर्व तालुका कृषी अधिकारी, खत विक्रेते व गुण नियंत्रण निरीक्षक यांनी शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करून अॅप वापराबाबत मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास त्यांनी तालुकानिहाय नेमलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील गुण नियंत्रण निरीक्षक आणि पंचायत समिती कार्यालयात कार्यरत गुण नियंत्रण निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा