You are currently viewing भक्तीचे बायांग

भक्तीचे बायांग

*काव्यप्रेमी महाराष्ट्र साहित्य समूहाचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम लेख*

 

*भक्तीचे बायांग*

 

(भक्तीच्या नावाखालील ढोंगीपणा म्हणजे अध्यात्म नव्हे!)

 

चिंतन : भूमिपुत्र वाघ

भक्ती ही मनाची निर्मळता आहे, विचारांची पवित्रता आहे आणि आचरणातील प्रामाणिकपणा आहे. भक्तीच्या माध्यमातून माणसाने स्वतःमध्ये नम्रता, दया, क्षमा, शांती आणि परोपकाराची भावना निर्माण करणे अपेक्षित आहे. मात्र, आज भक्तीच्या नावाखाली जे काही प्रकार सुरू आहेत, त्यांचा खऱ्या अध्यात्माशी कितपत संबंध आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

विविध रंगांची आणि वेशभूषेची कपडे परिधान करणे, अंगात आल्याचे नाटक करणे, विचित्र अंगविक्षेप करणे, नाचणे, पायातील चप्पल काढून चालणे, पक्षी-प्राण्यांचे बळी देणे, नाचगाण्यात रमून जाणे, मोठमोठ्याने भक्तीचे आव्हान करणे, स्पीकर आणि डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात स्वतःला हरवून टाकणे, या गोष्टी म्हणजे भक्ती नव्हे. भक्तीच्या नावाखाली होणारे असे बाह्य प्रदर्शन म्हणजे भक्तीचे बायांगच म्हणावे लागेल.

देवाला मोठ्या आवाजाची गरज आहे का? भक्ती सिद्ध करण्यासाठी शरीराचे विचित्र हावभाव करावे लागतात का? ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी मुक्या प्राण्यांचे बळी द्यावे लागतात का? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाने आपल्या विवेकबुद्धीने शोधली पाहिजेत.

खरी भक्ती माणसाला शांतता देते, तर ढोंगीपणा माणसाला प्रदर्शनप्रिय बनवतो. खरी भक्ती दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव करून देते, तर दिखाऊ भक्ती अनेकदा माणसाला स्वतःच्याच प्रदर्शनात गुंतवून ठेवते. देवाच्या नावाने नाचताना जर शेजारच्या दुःखी माणसाचे अश्रू दिसत नसतील, तर त्या भक्तीचा उपयोग काय? देवाच्या नावाने जयघोष करताना जर माणुसकीचा आवाज ऐकू येत नसेल, तर त्या श्रद्धेचा अर्थ काय?

संतांनी नेहमीच सदाचार, प्रेम, समता आणि परोपकाराचा मार्ग दाखवला. भक्तीचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर तो आपल्या वर्तनातून दिसला पाहिजे. गरजूंना मदत करणे, भुकेल्याला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी देणे, निसर्गाचे रक्षण करणे, अंधश्रद्धेपासून दूर राहणे आणि प्रत्येक जीवाविषयी करुणा बाळगणे, हीच खरी ईश्वरसेवा आहे.

धर्म आणि श्रद्धा यांचा आदर असला पाहिजे; परंतु श्रद्धेच्या नावाखाली विवेकाला तिलांजली देणे योग्य नाही. प्रत्येक धार्मिक कृतीचे मूल्यमापन माणुसकी, सामाजिक हित आणि नैतिकतेच्या कसोटीवर झाले पाहिजे. विशेषतः ध्वनिप्रदूषणामुळे लहान मुले, वृद्ध, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असेल, तर भक्तीच्या नावाखाली त्यांचे दुःख वाढवणे हा कोणता धर्म?

शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, भक्ती ही दाखवण्याची गोष्ट नाही, तर जगण्याची पद्धत आहे. देवाला फसवता येत नाही आणि बाह्य प्रदर्शनातून अंतःकरणाची शुद्धता सिद्ध होत नाही. भक्तीच्या नावाखालील बायांग सोडून माणुसकीचा मार्ग स्वीकारला, तरच भक्तीचे खरे अंतरंग उलगडेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा