You are currently viewing “दसऱ्याला जळतो तो पुतळा, आणि समाजात फिरतो तो रावण!”

“दसऱ्याला जळतो तो पुतळा, आणि समाजात फिरतो तो रावण!”

*जागतिक साकव्य विकास मंच सदस्य तथा साहित्यरत्न लेखणी सम्राट विचारमंच महाराष्ट्राचे प्रशासक लेखक कवी प्रभाकर भामरे लिखित अप्रतिम लेख*

 

*”दसऱ्याला जळतो तो पुतळा, आणि समाजात फिरतो तो रावण!”*

 

आज दसरा. चौकाचौकात, गल्लोगल्ली रावणाचे पुतळे उभे राहतील. शिंग फुंकले जाईल, टाळ्या वाजतील आणि एका क्षणात तो कागदाचा, बांबूचा रावण आगीच्या ज्वाळेत भस्म होईल. लोक म्हणतील, “अधर्मावर धर्माचा विजय झाला!”

 

पण खरंच झाला का?

 

आगीची ती ज्वाळा विझताच, अंधारात पुन्हा एक रावण चालू लागतो. तो दहा तोंडांचा नाही, पण दहा मुखवटे घालून फिरतो. कधी तो वासनेच्या नजरेत लपलेला असतो, कधी तो हुंड्याच्या मागणीत दडलेला असतो, कधी तो लेकीच्या- सुनेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या जिभेत वसलेला असतो. त्याला जाळायला कोणतीही आग पुरेशी नाही, कारण तो पुतळ्यात नाही, तो प्रवृत्तीत जिवंत आहे.

 

त्रेतायुगात सीतेचे हरण झाले होते, तेव्हा किमान राम होता. सीतेसाठी समुद्रावर सेतू बांधणारा, वानरसेनेसह लंकेत जाऊन युद्ध करणारा राम होता. आज सीतेची अब्रू रोज दावणीला लागते आहे. बस मध्ये, शाळेत, ऑफिसात, घरात… कुठेही ती सुरक्षित नाही. पण तिच्यासाठी सेतू बांधणारा राम कुठे दिसत नाही. आज राम फक्त मंदिरातील मूर्तीत आणि भिंतीवरील कॅलेंडरमध्ये उरला आहे. रस्त्यावर मात्र फक्त बघ्यांची गर्दी उरली आहे.

 

माय-लेकीवर, सुनेवर होणारा अत्याचार हा केवळ बातमी नाही. तो एका काळजाचा तुकडा तुटल्याचा आवाज आहे. ज्या घरात लेक जन्माला येते, त्या घरात आनंद साजरा व्हायला हवा, पण आज तिथे भीतीचा पहारा बसला आहे. ज्या सुनेला लक्ष्मी म्हणून आणले, तिलाच जाचाच्या आगीत होरपळायला लावले जाते. ही कोणती संस्कृती? जिथे स्त्रीला देवी म्हणून पुजायचे आणि माणूस म्हणून जगू द्यायचे नाही!

 

आपण रावण जाळतो, पण आपल्यातील रावणाला कधी जाळणार?

रावणाला दहा तोंडे होती, म्हणून तो ओळखू येत होता. आजच्या रावणाला एकच तोंड आहे, पण त्यात दहा पट कपट आहे. तो आपल्याच शेजारी राहतो, आपल्याच सोबत काम करतो, कधी कधी आपल्याच घरात असतो.

 

खरा दसरा तोच, ज्या दिवशी आपण बाहेरचा पुतळा नाही, तर मनातला रावण जाळू.

ज्या दिवशी मुलीच्या जन्मावर घरात पेढे वाटले जातील,

ज्या दिवशी सुनेला लेकीसारखी माया मिळेल,

ज्या दिवशी स्त्रीकडे पाहताना नजर आदराने झुकेल,

त्या दिवशी समजावे, राम पुन्हा जन्माला आला आहे.

 

तोपर्यंत दसऱ्याच्या शुभेच्छा देण्याआधी, आपणच आपल्या मनाला एक प्रश्न विचारूया

 

*”आपण रावण जाळणाऱ्यांपैकी आहेत, की रावण जपणाऱ्यांपैकी?”*

 

कारण पुतळा जाळणे सोपे आहे, प्रवृत्ती जाळणे कठीण आहे. आणि जोपर्यंत आपण ती प्रवृत्ती जाळत नाही, तोपर्यंत प्रत्येक दसरा हा केवळ एक सोहळा राहील, विजयोत्सव नाही!

 

इंदुमाई – प्रभाकर भामरे, धुळे.

प्रतिक्रिया व्यक्त करा