*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या सौ.स्नेहा मुकुंद शिंपी लिखित उपवासाच्या अनोख्या पाककृती*
*उपवासाच्या अनोख्या हटके पाककृती…..*
१. *शेंगदाण्याचे रोल*
साहित्य – १ कप शेंगदाणा कूट, १ कप कुस्करलेले बटाटे, अर्धा कप उकडून कुस्करलेला सुरण, अर्धा कप आरारूट पुड, पाव कप बारीक चिरलेली पुदिन्याची पानं, २ टीस्पून आलं – हिरवी मिरची पेस्ट, १ टीस्पून साखर, स्वादानुसार सैंधव मीठ, तळण्यासाठी तेल ..
कृती – १ टीस्पून शेंगदाणे कुट, बटाटे, सुरण, आलं – मिरची पेस्ट, पुदिना, मीठ, साखर आणि १ टीस्पून आरारूट पुड यांचं एकत्रित मिश्रण तयार करून चांगले मळून घ्या. या मिश्रणाचे रोल तयार करून उर्वरित आरारूट मध्ये २ टीस्पून पाणी एकत्र करून मिश्रण तयार करून ठेवावे. एका थाळीत उर्वरित शेंगदाण्याचे कूट पसरून ठेवा . तयार केलेले रोल्स् आधी आरारूट मिश्रणात घोळवून नंतर शेंगदाण्याच्या कुटामध्ये घोळवा आणि गरमागरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या…
२. *वरई स्टफ्ड दही वडे …*
साहित्य वड्यांसाठी – अर्धा कप वरई , १ उकडलेला बटाटा, २ टीस्पून राजगिरा पीठ, १ टीस्पून आलं – हिरवी मिरची पेस्ट, स्वादानुसार सैंधव मीठ, तळण्यासाठी तेल.
सारणासाठी – अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप खोबरं, थोडी काजूची पूड, स्वादानुसार काळीमिरी पुड, साखर व सैंधव..
सजावटीसाठी – २ कप ताजं दही, खजूराची गोड चटणी, १ टीस्पून जिरे पूड, स्वादानुसार सैंधव.
कृती – प्रथम वरई वाफेवर शिजवून घ्या. त्यात कुस्करलेला बटाटा, राजगिरा पीठ, सैंधव आणि आलं – हिरवी मिरची पेस्ट घालून व्यवस्थित मळून घ्या. या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या. खोबरं , कोथिंबीर, काजू पुड, सैंधव, आणि साखर यांचे एकजीव मिश्रण तयार करून घ्या. वरईच्या गोळीची वाटी तयार करून त्यात हे मिश्रण भरावे व गोळी बंद करून गोलाकार करून घ्या. गरम तेलात हे वडे सोनेरी रंगावर तळून घ्या. दह्यामध्ये साखर घालून चांगले फेटून घ्या. सर्व्हिंग करतेवेळी डिशमध्ये सर्वप्रथम गरमागरम वडे ठेवा. त्यावर दही , जिरेपूड, खजुराची चटणी आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा ..
३. *पनीर – अक्रोड कलश …*
साहित्य – १ कप कुस्करलेला पनीर, १ कप मावा, अर्धा कप अक्रोड चुरा, पाव कप नारळाचा चव, पाव कप कन्डेंस्ड मिल्क, अर्धा टीस्पून वेलची पूड, चेरी ..
कृती – पनीर ,अक्रोड, मावा आणि नारळाचा चव वेगवेगळे कोरडेच परतून घ्या. नंतर हे सर्व मिश्रण एकत्र करून त्यात कन्डेंस्ड मिल्क आणि वेलची पूड घालून एकजीव मिश्रण तयार करा.. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे लहान लहान गोळे करून कलशाचा आकार द्यावा. वरून चेरी लावून सजवा आणि सर्व्ह करा…
४. *कोकोनट बाॅल विथ स्ट्राॅबेरी रबडी..*
साहित्य – १ लिटर दुधाची रबडी, १ कप स्ट्राॅबेरी गर, १ कप नारळाचा चव, पाव कप कन्डेंस्ड मिल्क, थोडे सुकामेवा काप..
कृती – रबडीमध्ये स्ट्राॅबेरीचा गर घालून एकजीव मिश्रण तयार करा आणि थंड होण्याकरिता फ्रिज मध्ये ठेवा. नारळाचा चव आणि कन्डेंस्ड मिल्क यांचं एकजीव मिश्रण तयार करून घ्या. त्याचे लहान लहान गोळे तयार करून घ्या. सर्व्हिंग डिश मध्ये सर्वप्रथम कोकोनट बाॅल्स् ठेवून त्यावर स्ट्राॅबेरी – रबडी घालून वरून सुकामेवा काप घालून सजवावे..व सर्व्ह करावे..
*सौ. स्नेहा मुकुंद शिंपी*
*नाशिक*
