‘लेक लाडकी’ योजनेतून मुलींच्या शिक्षणाला आर्थिक बळ – जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी
नवरात्रोत्सव विशेष : पात्र मुलींना 18 वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने 1 लाख 1 हजार रुपयांचे अर्थसहाय्य
सिंधुदुर्ग
मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणाला चालना देणे आणि त्यांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत ‘लेक लाडकी’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र मुलींना जन्मापासून वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत पाच टप्प्यांत एकूण 1 लाख 1 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी यांनी दिली.
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या योजनांची माहिती देण्याच्या उपक्रमांतर्गत नवव्या दिवशी मोरपंखी रंगाच्या निमित्ताने त्यांनी ‘लेक लाडकी’ योजनेविषयी माहिती दिली.
पाच टप्प्यांत मिळणार आर्थिक लाभ
लेक लाडकी योजनेंतर्गत पात्र मुलींना पुढीलप्रमाणे आर्थिक सहाय्य दिले जाते.
* मुलीच्या जन्मानंतर – 5 हजार रुपये.
* मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यानंतर – 6 हजार रुपये.
* मुलगी इयत्ता सहावीत गेल्यानंतर – 7 हजार रुपये.
* मुलगी इयत्ता अकरावीत गेल्यानंतर – 8 हजार रुपये.
* मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर – 75 हजार रुपये.
अशा प्रकारे पाच टप्प्यांत एकूण 1 लाख 1 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
योजनेच्या प्रमुख पात्रता अटी
1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना लागू आहे. पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या पात्र कुटुंबांतील एक किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तसेच अर्जदार कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्जासाठी कुठे संपर्क साधावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कुटुंबांनी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती धुरी यांनी केले.
मुलींच्या जन्माचे स्वागत, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन आणि आर्थिक सक्षमीकरण यासाठी ‘लेक लाडकी’ योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. पात्र कुटुंबांनी या योजनेची माहिती घेऊन लाभासाठी अर्ज करावा.