You are currently viewing निरामय जीवन जगण्यासाठी योगसाधना आवश्यक! – विश्वास सोहोनी

निरामय जीवन जगण्यासाठी योगसाधना आवश्यक! – विश्वास सोहोनी

निरामय जीवन जगण्यासाठी योगसाधना आवश्यक! – विश्वास सोहोनी

*’योग स्वास्थ्य’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न*

पिंपरी

‘बैठी जीवनशैली आणि आजच्या धकाधकीच्या काळात निरामय जीवन जगण्यासाठी योगसाधना आवश्यक आहे!’ असे प्रतिपादन जानकीदेवी बजाज ग्रामविकास सामाजिक संस्थेचे संस्थापक विश्वास सोहोनी यांनी खिंवसरा पाटील शिक्षण संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी केले. योगाध्यापक भाऊसाहेब गायकवाड लिखित ‘योग स्वास्थ्य’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना विश्वास सोहोनी बोलत होते. योगशिक्षक सुभाष चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच लोकमान्य टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता घोडे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, प्रकाशिका सुप्रिया ऐनापुरे, वंदना गायकवाड, लेखक भाऊसाहेब गायकवाड यांची व्यासपीठावर आणि पिंपरी – चिंचवड, पुणे परिसरातील मान्यवर साहित्यिकांची सभागृहात उपस्थिती होती.

विश्वास सोहोनी पुढे म्हणाले की, ‘योगसाधनेसाठी आपल्या शरीराला पूर्णपणे बदलण्याची मानसिकता अंगीकारली पाहिजे. त्यादृष्टीने ‘योग स्वास्थ्य’ हे पुस्तक उपयुक्त आहे!’ सुरेश कंक यांनी, ‘आहार, विहार, निद्रा याला योगासनांची जोड दिल्यास माणूस निरोगी अन् दीर्घायुषी होतो!’ असे मत व्यक्त करीत
“योग करावा, योग करावा…
ध्यान लावूनी विठ्ठल पहावा!” ही कविता सादर केली. सुनीता घोडे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. लेखक भाऊसाहेब गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून, ‘सुमारे पंचवीस वर्षांपासून सर्वसामान्य माणसाला सहज उमगेल,समजेल अशा पद्धतीने योगसाधनेचा प्रचार अन् प्रसार करीत आहे. २००८ मध्ये लिहिलेल्या ‘सुलभ योगसाधना’ या पुस्तकाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने ‘योग स्वास्थ्य’चे लेखन केले आहे!’ अशी भूमिका मांडली. सुभाष चव्हाण यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘गायकवाड यांच्या लेखनाला प्रदीर्घ अनुभवाची जोड असून निरोगी आयुष्याची गुरूकिल्ली म्हणून हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल!’ असा विश्वास व्यक्त केला.

सरस्वतीपूजन, शंखवादन आणि शिवाजी पौळ यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अमितेश गायकवाड, प्रतीक्षा गायकवाड, संजय देशमुख, अरुण परदेशी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. शामराव सरकाळे यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा