*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी इंदुमाय- प्रभाकर भामरे लिखित अप्रतिम लेख*
*मातीतला गंध*
श्रावण सरला होता. आभाळाच्या कुशीतून मृगाच्या सरी बरसून गेल्या होत्या. आणि अंगणातल्या जाई-जुईच्या वेलीवर जणू सुगंधाचा शिडकावा झाला होता. पण चिमुकल्या अथर्वच्या घरात मात्र उदासीचे मळभ दाटले होते.
त्याची आई आजारी. बाबा कामावरून काढले गेलेले. आणि समोर गणेशोत्सव.
आई, यंदा बाप्पा येणार नाही का गं ? अथर्वने इवल्याशा हाताने आईच्या पदराला हिसका दिला.
आईच्या डोळ्यातले पाणी तिने पदराआड लपवले. ती म्हणाली, बाळा, बाप्पा तर भावाचा भुकेला. तो येईलच रे.
पण घरात मूर्ती आणायला पैसे नव्हते.
अथर्व रडला नाही. तो उठला. त्याने अंगणातली ओली माती घेतली. त्या मातीला त्याने पाण्याने भिजवले, जणू अश्रूंनीच भिजवले. आणि इवल्याशा हातांनी तो आकार देऊ लागला.
कधी सोंड वाकडी व्हायची, कधी कान तुटायचे. पण त्याच्या बोटात जादू होती. ती जादू भक्तीची होती.
तीन दिवस तो मातीशीच बोलत होता. तूच माझा बाप्पा.
चौथ्या दिवशी, पहाटे… अंगणात एक सुंदर, इवलीशी मूर्ती उभी होती. वेडीवाकडी, पण तेजस्वी. त्या मातीच्या मूर्तीमधून जणू पारिजातकाचा गंध दरवळत होता.
आईने पाहिले आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, अरे, हा तर साक्षात…
तेवढ्यात दारातून बाबा धावत आले. त्यांच्या हातात पेढ्याचा पुडा होता. अगं, ऐकलंस का ? मालकाने पुन्हा कामावर बोलावले ! म्हणाले, बाप्पा आले धावून, लक्ष्मी घेऊन !
त्या क्षणी अथर्वच्या मातीच्या बाप्पाकडे पाहून सगळ्यांना वाटले…
खरंच, बाप्पा आले धावून… मातीतून, अश्रूतून, आणि लेकराच्या निरागस श्रद्धेतून ! कारण बाप्पा कधी बाजारात विकत मिळत नाही, तो तर मनाच्या गाभाऱ्यात फुलतो, जसा अंगणात मोगरा फुलतो, सुगंधाची उधळण करीत.
@इंदुमाय- प्रभाकर भामरे, धुळे.
