You are currently viewing बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत अमल ठाकूर यांच्या सदाबहार गीतांनी रंगली स्वरमैफल
Oplus_16908288

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत अमल ठाकूर यांच्या सदाबहार गीतांनी रंगली स्वरमैफल

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला ‘स्वरसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन; भक्तिगीत, भावगीतांच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध

कुडाळ : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला बॅ. नाथ पै शिक्षण संस्था आणि कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वरसंध्या’ या संगीतमय कार्यक्रमात सिंधुदुर्गचे सुपुत्र गायक व संगीतकार अमल ठाकूर यांच्या सदाबहार गीतांनी स्वरमैफल रंगली. त्यांच्या सुरेल आणि सुमधुर आवाजातील भक्तिगीते व भावगीतांनी कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचा परिसर स्वरानंदात न्हाऊन निघाला. उपस्थित रसिक श्रोते या गीतांच्या सुरांमध्ये तल्लीन झाले.

परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराज यांच्या जीवनावर आधारित भक्तिरसाने ओथंबलेल्या अनेक श्रवणीय गीतरचना साकारलेल्या अमल ठाकूर यांनी या कार्यक्रमात विविध भक्तिगीते आणि भावगीते सादर केली. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या पुढाकाराने आणि कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने या ‘स्वरसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात ‘जय जय राम कृष्ण हरी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘हृदयाच्या तालावर…’, ‘मुरलीधर शाम’, ‘घेई छंद मकरंद’, ‘मलयगिरीच्या चंदन गंधित धूप तुला वाहिला…’, ‘गुंतता हृदय हे…’, ‘तू बुद्धी दे, तू तेज दे’, ‘अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया…’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘जय शंकरा गंगाधरा’, ‘वृंदावनी वेणू वाजे’ आणि ‘काटा रुते कुणाला…’ अशा एकापेक्षा एक सरस गीतांचे सादरीकरण करण्यात आले. या गीतांनी उपस्थित रसिकांच्या माना डोलावल्या, तर काही गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून वातावरण भक्तिमय आणि प्रसन्न केले.

याच मैफलीत सिंधुदुर्गचे आणखी एक सुपुत्र प्रसन्न प्रभूतेंडोलकर यांनी ‘शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले’ हे भावस्पर्शी गीत सादर केले. त्यांच्या या सादरीकरणालाही उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

या स्वरमैफलीला रजत गाळवणकर आणि सिद्धेश कुंटे यांनी तबल्याची साथ दिली. आदित्य आचरेकर यांनी हार्मोनियम, तर मंदार जोशी यांनी ऑर्गनची साथ केली. सुप्रसिद्ध गायक, कीर्तनकार व अभिनेते प्रशांत धोंड, तालरक्षक कु. सुखी सामंत आणि राजन नाईक यांच्या उपस्थितीनेही कार्यक्रमाची रंगत वाढली. अमल ठाकूर यांच्या सुरेल गायनाने ‘स्वरसंध्या’ शारदीय चांदण्यांच्या सुरेल आणि रसपूर्ण वातावरणात रंगली. प्रफुल्ल वालावलकर यांच्या प्रसंगोचित आणि रसपूर्ण निवेदनाने कार्यक्रमाची लज्जत अधिकच वाढवली.

म्हापणचे सुपुत्र रामकृष्ण ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या ‘स्वरसंध्या’ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी गीत सादर करणाऱ्या कलाकारांसह राजन नाईक, उमेश गाळवणकर, प्रदीप बर्डे, प्रफुल्ल वालावलकर, रणजीत देसाई, मनोज वालावलकर, सुंदर गाळवणकर, सुनील सौदागर, सचिन कुडतरकर यांच्यासह अनेक संगीतप्रेमी रसिक श्रोते उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. प्रणव प्रभु, श्रीकृष्ण सामंत, गौरव खानोलकर, स्वानंद सामंत, प्रसाद नाईक, अमित तेंडोलकर आणि रवी प्रभु यांनी विशेष परिश्रम घेतले.

नवरात्रीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या रमणीय संगीतमय कार्यक्रमातून अमल ठाकूर यांच्या सुरेल गायनाचा अविस्मरणीय अनुभव रसिकांना मिळाला. स्वर आणि भक्तिरसाच्या या आनंददायी मैफलीबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे आभार मानून त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा