You are currently viewing कुडाळ तालुक्यातील आंबेरी गावाचा वाडोस माणगाव मंडळात मध्ये समावेश

कुडाळ तालुक्यातील आंबेरी गावाचा वाडोस माणगाव मंडळात मध्ये समावेश

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील महसूल मंडळांच्या पुनर्रचनेअंतर्गत आंबेरी गावाचा तुळसुली कर्याद नारूर तलाठी साझातून माणगाव मंडळातील वाडोस तलाठी साझामध्ये समावेश करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी अंतिम अधिसूचनेद्वारे मान्यता दिली आहे. यामुळे आंबेरी गावाचा गोठोस महसूल मंडळातून माणगाव महसूल मंडळात समावेश करण्यात आला आहे.

राज्यात वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणामुळे महसूल यंत्रणेवरील कामाचा वाढता ताण लक्षात घेऊन शासनाने तलाठी साझे व महसूल मंडळांच्या पुनर्रचनेचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वीच्या २३६ तलाठी साझांमध्ये ९९ नवीन साझांची निर्मिती करून एकूण ३३५ तलाठी साझे आणि ५७ महसूल मंडळे निर्माण करण्यात आली आहेत.

उपविभागीय अधिकारी, कुडाळ यांनी सादर केलेल्या अहवालानुसार आंबेरी गावाचा वाडोस तलाठी साझामध्ये समावेश करणे ग्रामस्थांच्या सोयीचे ठरणार आहे. तलाठी साझाचे मुख्यालय आणि त्यास संलग्न गाव यांमधील अंतर, उपलब्ध दळणवळण व्यवस्था तसेच स्थानिक नागरिकांची सोय विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ४ च्या पोटकलम (२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी साझा आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा