You are currently viewing सांजवेळी

सांजवेळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सांजवेळी*

 

(वृत्त : व्योमगंगा)

 

खूप झाल्या खेळ गोष्टीं ये घराला फार घाई

सांजवेळी उंबऱ्याशी दीप लावी सूनबाई

 

मावळाया लागले अन वेळ झाली चंचलेची

काडवाती पेटवोनी कर तयारी स्वागताची

नष्ट व्हावे कष्ट सारे रुष्ट सारे दूर जाई

सांजवेळी उंबऱ्याशी दीप लावी सूनबाई

 

बैस येथे पाट मांडी लेकरे बघ होय गोळा

रामरक्षेच्या सुरांनी शांतवावी सांजवेळा

देवचरणी प्रार्थनेने लीन होई माय बाई

सांजवेळी उंबऱ्याशी दीप लावी सूनबाई

 

हंबरोनी हाक मारी गोठणीचा सान गोऱ्हा

धार सोडी माय त्याची वासराचा काय तोरा

दोहवावे प्रेमभारे आज त्याची तूच माई

सांजवेळी उंबऱ्याशी दीप लावी सूनबाई

 

चूल आहे पेटलेली रांध आता ऊन काही

अन्नपूर्णे लेकरु बघ भाकरीची वाट पाही

तूच लक्ष्मी या घराची तूच येथे सर्व काही

सांजवेळी उंबऱ्याशी दीप लावी सूनबाई

 

श्रीनिवास गडकरी

बावधन पुणे

@सर्व हक्क सुरक्षित

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

मोबाईल 9130861304

सात ऑक्टोबर दोन हजार सहव्विस

प्रतिक्रिया व्यक्त करा