You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ICU च्या समस्येवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ICU च्या समस्येवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ICU च्या समस्येवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी

मॉड्युलर ICU चा वॉरंटी कालावधी संपला; AMC- CMC अभावी कुलिंग, UPS व सक्शन यंत्रणेत बिघाड

सावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील मॉड्युलर ICU चा Nidus कंपनीचा वॉरंटी कालावधी संपला असून, AMC/CMC करण्यात आले नसल्याने ICU मधील विविध तांत्रिक बिघाडांची दुरुस्ती रखडली आहे. ICU मधील कुलिंग व्यवस्था, UPS बॅटरी, सक्शन यंत्रणा तसेच हँड जनरेटरमध्ये समस्या निर्माण झाल्याने रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रुग्णालय प्रशासनाने Nidus कंपनीशी AMC/CMC संदर्भात पत्रव्यवहार केला असता, अंतिम प्रकल्पाची सुमारे साडेदहा लाख रुपयांची शिल्लक रक्कम भरणे आवश्यक असल्याचे कंपनीकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे AMC/CMC प्रक्रिया रखडली असून, तांत्रिक समस्या सोडविण्यात अडचणी येत आहेत.
दरम्यान, नवीन इमारतीतील ICU महिला विभागाच्या पहिल्या मजल्यावरील एसी कुलिंग व्यवस्था मागील आठ दिवसांपासून बंद आहे. ऑक्टोबर महिन्यातील वाढलेल्या उष्णतेमुळे महिला रुग्णांना त्रास होत असून, पर्यायी व्यवस्था म्हणून स्टँड फॅनचा वापर करण्यात येत आहे.
जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांच्या पुढाकारातून तसेच समाजसेवक प्रफुल्ल सांगोडकर, राजू भालेकर आणि हॉटेल उद्योजक सुधीर ऊर्फ स्वामी नारायण पोकळे यांच्या मदतीतून यापूर्वी रुग्णालयाला दहा स्टँड फॅन उपलब्ध करून देण्यात आले होते. सध्या हेच फॅन ICU महिला विभागातील रुग्णांसाठी उपयोगी ठरत आहेत.
या पार्श्वभूमीवर जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र मसुरकर आणि नारायण राणे यांचे विश्वासू संयोजक संदीप कुडतरकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. ICU मधील तांत्रिक समस्या तातडीने दूर करून कुलिंग व्यवस्था पूर्ववत सुरू करावी, तसेच Nidus कंपनीसोबत AMC/CMC करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आणि जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा