You are currently viewing लोकप्रतिनिधींची वाट न पाहता ग्रामस्थांचे श्रमदान; गणपतीपूर्वी रस्ते व झाडी-झुडपांची स्वच्छता

लोकप्रतिनिधींची वाट न पाहता ग्रामस्थांचे श्रमदान; गणपतीपूर्वी रस्ते व झाडी-झुडपांची स्वच्छता

लोकप्रतिनिधींची वाट न पाहता ग्रामस्थांचे श्रमदान; गणपतीपूर्वी रस्ते व झाडी-झुडपांची स्वच्छता

ओसरगाव, अपराजवाडी, परबवाडी ग्रामस्थांचा पुढाकार; कायमस्वरूपी रस्त्यासाठी उपोषण व आंदोलनाचा निर्वाणीचा इशारा

ओसरगाव :

ग्रामपंचायत व सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी अथवा कार्यकर्ते यांची कोणतीही वाट न पाहता ओसरगाव, अपराजवाडी व परबवाडी येथील ग्रामस्थ दरवर्षी गणपतीपूर्वी श्रमदानातून गावातील रस्ते तसेच दुतर्फा वाढलेली झाडी-झुडपे साफ करण्याचे काम करतात. यंदाही ग्रामस्थांनी पुढाकार घेत अंगमेहनतीने रस्त्यांची साफसफाई केली.
या उपक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य श्री. विनोद राणे यांनी ग्रास कटर तसेच चहापाण्याची व्यवस्था करून सहकार्य केले. तसेच श्री. सुनील नाईक पाडावे मित्र मंडळ, अपराजवाडीचे ग्रामस्थ आणि परबवाडीचे ग्रामस्थ यांनीही श्रमदानाच्या माध्यमातून आपले योगदान दिले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे रस्त्यांची साफसफाई होऊन वाहतुकीस काही प्रमाणात सुलभता निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या या सामाजिक बांधिलकीचे संपूर्ण गावाच्या वतीने जाहीर अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.
कायमस्वरूपी रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा
दरम्यान, केवळ तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी करून प्रश्न सोडविण्याऐवजी पावसाळा संपल्यानंतर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करून कायमस्वरूपी रस्ता करण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. कायमस्वरूपी रस्ता न झाल्यास उपोषण तसेच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
गणपतीपूर्वी दरवर्षी ग्रामस्थांना स्वतः श्रमदान करून रस्ते व परिसर स्वच्छ करावा लागत असल्याने प्रशासनाने याची दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा