अच्चूत शेट मानकर यांच्या घरी गणरायाचे उत्साहात आगमन
अजित नाडकर्णी यांनी घेतले श्रीगणपती व गौराईचे दर्शन; मानकर कुटुंबीयांच्या आतिथ्याचे केले कौतुक
कणकवली
सामाजिक कार्यकर्ते अच्चूत शेट मानकर यांच्या घरी श्रीगणपती बाप्पा आणि गौराई मातेचे उत्साहात आगमन झाले. यानिमित्त घरात आकर्षक सजावट करण्यात आली असून, सुमारे सहा फूट उंचीची सुबक श्रीगणपतीची मूर्ती आणि बाजूला गौराई मातेची सुंदर मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.
माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी मानकर यांच्या घरी भेट देऊन श्रीगणपती बाप्पा व गौराई मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी अच्चूत शेट मानकर यांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. आपल्या वडिलांनी दिलेल्या जागेत उभारलेल्या गणपतीच्या सुबक मूर्तीचे आणि घरातील सजावटीचे नाडकर्णी यांनी कौतुक केले.
मानकर कुटुंबातील तीन मुले आणि सुना यांच्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने घर आनंदाने भरून गेले आहे. मुंबई येथेही मानकर यांच्या मुलांच्या घरी अशाच प्रकारे पाहुणचार व आदरातिथ्य केले जाते, असे अजित नाडकर्णी यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, यावेळी सचिन मानकर यांनी अजित नाडकर्णी यांना, “अजित काका, पुन्हा ग्रामपंचायतीत या,” अशी आपुलकीची विनंती केली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत कुटुंबीयांमध्ये आनंदाचे व आपुलकीचे वातावरण पाहायला मिळाले.
