विटे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता, सामाजिक एकता आणि लोकभावनेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला राज्य शासनाने ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्राच्या या समृद्ध व गौरवशाली सांस्कृतिक परंपरेचे जागतिक स्तरावर दस्तऐवजीकरण व्हावे तसेच गणेशोत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) अमूर्त सांस्कृतिक वारसा दर्जासाठीच्या प्रयत्नांना बळ मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत व्यापक लोकसहभागाची मोहीम राबविण्यात येत आहे.
या महत्त्वपूर्ण सांस्कृतिक दस्तऐवजीकरण उपक्रमात सांगली–मिरज–कुपवाड शहरातील नागरिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तिकार, कलाकार, कारागीर, गृहनिर्माण संस्था, महिला बचत गट तसेच विविध सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाशी संबंधित कला, संस्कृती, परंपरा, चालीरीती, पूजा पद्धती, सजावट, मूर्तिकला आणि लोकसहभाग यांचे डिजिटल माध्यमातून जतन करण्यासाठी ‘Bappa.org’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरगुती गणेशोत्सवाची तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परंपरेची माहिती, छायाचित्रे आणि व्हिडिओ डिजिटल स्वरूपात नोंदविता येणार आहेत.
आपल्या घरात किंवा परिसरात अनेक वर्षांपासून जपल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाच्या परंपरा, आरास, पूजा पद्धती, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांची नोंद करून त्या पुढील पिढ्यांसाठी डिजिटल सांस्कृतिक ठेवा म्हणून जतन करण्याची ही संधी आहे.
‘घरोघरी बाप्पा’ — आपल्या घरच्या परंपरेची नोंद करा. आपल्या घरातील गणेशोत्सवाशी संबंधित— पारंपरिक पूजा-विधी, कौटुंबिक चालीरीती व परंपरा, गणेशमूर्तीची वैशिष्ट्ये, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, घरातील आकर्षक व पारंपरिक आरास, सजावट व कलाकुसर, पारंपरिक खाद्यसंस्कृती, गणेशोत्सवाशी संबंधित कौटुंबिक आठवणी यांची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदविता येणार आहे.
आपल्या गणेशोत्सव परंपरेची यशस्वी नोंदणी करणाऱ्या नागरिकांना ‘Digital Cultural Preserver Certificate’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
सांगली–मिरज परिसराला मूर्तिकला, वाद्यनिर्मिती, संगीत, नाट्य आणि विविध लोककलांची समृद्ध परंपरा लाभली आहे.
शहरातील मूर्तिकार, गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कार्यशाळा, कलाकार, लोककलावंत तसेच पारंपरिक कलांशी संबंधित कारागिरांची माहिती, कार्याची वैशिष्ट्ये, छायाचित्रे आणि व्हिडिओ डिजिटल स्वरूपात संकलित करण्यासाठी नागरिकांनी व संबंधित घटकांनी पुढाकार घ्यावा.
यामुळे सांगली–मिरज–कुपवाडच्या स्थानिक कला व कौशल्यपरंपरेची व्यापक स्तरावर ओळख निर्माण होण्यास मदत होणार आहे.
शहरातील गृहनिर्माण संस्था, Co-operative Housing Societies, Resident Welfare Associations (RWAs) तसेच महिला बचत गटांनी आपल्या व्हॉट्सॲप समूहांमधून ‘Bappa.org’ ची नोंदणी लिंक व QR कोड अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवावा.
गणेशोत्सव मंडळांनीही आपल्या मंडळाची परंपरा, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, आरास, मूर्तिकला आणि लोकसहभागाची माहिती या डिजिटल उपक्रमामध्ये नोंदवावी.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेचा, लोककलेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि सामुदायिक सहभागाचा उत्सव आहे.
आपल्या घरातील, सोसायटीतील किंवा गणेश मंडळातील वर्षानुवर्षे जपलेल्या परंपरांची आज डिजिटल माध्यमातून नोंद केली, तर ती उद्याच्या पिढ्यांसाठी अमूल्य सांस्कृतिक ठेवा ठरू शकते.
“आपल्या बाप्पाची परंपरा केवळ आपल्या घरापुरती किंवा परिसरापुरती मर्यादित न ठेवता ती जगाच्या नकाशावर पोहोचवूया. सांगली–मिरज–कुपवाड शहरातील प्रत्येक नागरिक, गणेशोत्सव मंडळ, मूर्तिकार, कलाकार, कारागीर आणि सामाजिक संस्थेने ‘Bappa.org’ वर आपल्या गणेशोत्सव परंपरेची नोंद करून महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक सांस्कृतिक दस्तऐवजीकरण उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा.”
