देवली पुलानजीक भीषण दुचाकी अपघात; दोन बालकांचा जागीच मृत्यू
सचिन निकम गंभीर जखमी; गोवा बांबुळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल, मालवण पोलिसांकडून तपास सुरू
मालवण
तालुक्यातील देवली पुलानजीक बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, देवली येथून कुंभारमाठच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. अपघातात ओंकार भावा निकम (वय १२) आणि राजू अर्जुन निकम (वय १०) या दोन्ही बालकांचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन अंकुश निकम हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी गोवा बांबुळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शेलार, सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक पंडित पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. भगत, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक आप्पा लुडबे, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्यात सहभाग घेतला.
या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, मालवण पोलिसांकडून अपघाताचा सखोल तपास सुरू आहे.
