सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, मिरज उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अपर तहसील कार्यालय सांगली तसेच अधिनस्त सर्व मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. सांगली, कुपवाड, बुधगाव, कसबे डिग्रज व कवठेपिरान परिसरातील सर्व पक्षकार व नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपले प्रलंबित महसुली वाद तडजोडीने मिटवावेत, असे आवाहन सांगली अपर तहसीलदार अश्विनी वरूटे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
महसूल प्रशासनातील अर्धन्यायिक (Quasi-Judicial) न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले जमिनीशी संबंधित महसुली दावे व अपिले परस्पर संमतीने आणि कायदेशीर तडजोडीने कायमस्वरूपी निकाली काढणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे पक्षकारांचा वेळ व पैसा वाचून न्यायालयीन ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
मंडळ अधिकारी स्तरावरील लोकअदालत सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता संबंधित मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये लोकअदालत होणार आहे. सांगली, कुपवाड, बुधगाव, कसबे डिग्रज आणि कवठेपिरान या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.
अपर तहसीलदार कार्यालय, सांगली स्तरावरील लोकअदालत गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता अपर तहसील कार्यालय, जुना राजवाडा परिसर, सांगली येथे लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे.
ज्या पक्षकारांचे दावे प्रलंबित आहेत, त्यांनी दोन्ही पक्षांच्या परस्पर संमतीने विहित नमुन्यातील (प्रपत्र-अ) तडजोड अर्ज संबंधित कार्यालयात सादर करावा. अर्जाची छाननी करून लोकअदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या संमतीने अंतिम कायदेशीर आदेश पारित केला जाणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
