*महाराष्ट्राचा राज्य उत्सव ‘महागणेशोत्सव’; आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत गणेश नृत्य-फुगड्यांनी थिरकली घारपी शाळा!*
बांदा
महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महागणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी विविध गणेशगीते, गणेश नृत्य, डान्स तसेच पारंपरिक फुगड्या सादर करत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले.
गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गणेशगीतांच्या तालावर विद्यार्थ्यांनी विविध नृत्ये सादर केली. आकर्षक हालचाली, तालबद्ध नृत्य आणि उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक फुगड्या खेळत आनंद लुटला. फुगड्यांच्या तालावर फेर धरताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता.
‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना आनंददायी, अनुभवाधारित आणि तणावमुक्त शिक्षणाचा अनुभव देणे हा असून, या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कला, संस्कृती आणि परंपरेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पारंपरिक लोककला अनुभवता आली, तसेच समूहभावना, सहकार्य आणि आत्मविश्वास विकसित करण्याची संधी मिळाली.
विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. गणेशगीतांचा सुरेल नाद, नृत्याचा ठेका आणि फुगड्यांचा ताल यामुळे घारपी शाळेचा परिसर आनंदाने आणि उत्साहाने भारून गेला. आनंदातून शिक्षण आणि शिक्षणातून संस्कृतीची जपणूक असा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक जे. डी. पाटील, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे, अंगणवाडी सेविका संजना गावकर, अमृता कविटकर तसेच मदतनीस संचिता सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.
