You are currently viewing पर्यटन व्यावसायिकांनी ठेवले बंदर विभागाच्या कारभारावर बोट

पर्यटन व्यावसायिकांनी ठेवले बंदर विभागाच्या कारभारावर बोट

अनेक महिने लोटले तरी जलक्रीडा व्यावसायिकांना प्रमाणपत्र मिळत नसल्याची व्यक्त केली नाराजी

मालवण

नव्या पर्यटन हंगामास प्रारंभ झाल्यावर काही जलक्रीडा व्यवसायिकांकडे सर्व्हे प्रमाणपत्र व इतर आवश्यक बाबींची पूर्तता झालेली नसल्याने बंदर विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याच्या पार्श्वभूमीवर आज बंदर विभागाचे अधिकारी व जलक्रीडा व्यावसायिक यांच्यात झालेल्या बैठकीत व्यावसायिकांनी बंदर विभागाच्या कारभारावरच बोट दाखवत सर्व्हे करून कित्येक महिने लोटले तरी सर्व्हे प्रमाणपत्र मिळत नसतानाही झालेली कारवाई चुकीची असल्याचे सांगत बंदर विभागाने थेट कारवाई न करता कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एक महिन्याची मुदत देऊन व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी केलेली मागणी यावेळी बंदर अधिकाऱ्यांनी मान्य केली. मात्र सर्व्हे सर्टिफिकेट साठी १४ व १५ सप्टेंबर रोजी मोहीम हाती घेण्यात येणार असून मुदती नंतर कागदपत्रे न आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. श्री. संदीप भुजबळ यांनी दिला.

गेल्या चार दिवसात मालवण किनारपट्टीवरील जलक्रीडा व्यवसायिकांवर बंदर विभागाने कागदपत्रे अपुरी असल्याच्या कारणास्तव दंडात्मक कारवाई केली. यामुळे व्यवसायिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर धुरीवाडा येथील संस्कार हॉल येथे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संदीप भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जलक्रीडा व्यावसायिकांची बैठक पार पडली. यावेळी मालवणचे बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील, सहाय्यक बंदर निरीक्षक अरविंद परदेशी, वेंगुर्ला बंदर निरीक्षक उमेश महाडिक यांसह जलक्रीडा व्यावसायिक रुपेश प्रभू, छोटू सावजी, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, दामोदर तोडणकर,सौ. अन्वेषा आचरेकर, मनोज खोबरेकर, संजय केळुसकर, राजन कुमठेकर, गोविंद धुरी, वैभव खोबरेकर, मनोज मेथर, राजेंद्र परुळेकर, हेमंत रामाडे, देवानंद चिंदरकर आदी व इतर उपस्थित होते.

सर्व्हे प्रमाणपत्र नसल्याने झालेल्या कारवाई बाबत यावेळी व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्व्हेअरने सर्व्हे करून महिने उलटले तरी सर्व्हे प्रमाणपत्र मिळालेले नाही. सर्व्हेअर कडे फाईल दिल्यावर ती अपलोड करण्याची जबाबदारी सर्व्हेअरची आहे, सर्व्हे प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी मुदत निश्चित करण्यात यावी, दर महिन्याला सर्व्हे साठी एक अधिकारी निश्चित करून त्याच्याकडून तात्काळ सर्टिफिकेट मिळण्याबाबत कार्यवाही करावी, याबाबत मेरीटाइम बोर्डाने आपले नियम अटी स्पष्ट करावेत, त्यानुसार व्यावसायिक कागदपत्रांची पूर्तता करतील असे यावेळी व्यावसायिकांनी सांगितले. यावर दि. १४ व १५ सप्टेंबर रोजी नौका सर्व्हेची मोहीम राबविण्यात येईल असे सांगितले.

तसेच प्रत्येक व्यावसायिक हा कागदपत्र जमविण्यासाठी जीवाचे रान करत आहे. कागपत्रांची पूर्तता केल्यावर त्यातील राहिलेल्या त्रुटींची माहिती तत्काळ दिली जात नाही. थेट कारवाई केली जाते. ही बाब चुकीची असून राहिलेल्या त्रुटीं बाबत व्यावसायिकांना पत्रे पाठविण्यात यावी, त्यानुसार त्रुटी भरून काढण्याचे काम व्यावसायिक करू शकतील अशी मागणीही यावेळी संजय केळुसकर यांनी केली. पर्यटन हंगाम सुरू झाला असून व्यावसायिकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एक महिना मुदत देऊन व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी छोटू सावजी, रुपेश प्रभू , देवानंद चिंदरकर यांसह इतर व्यवसायिकांनी केल्यावर त्यास बंदर अधिकाऱ्यांनी मान्यता दिली.

जलक्रीडा व्यावसायिक प्रत्येक वेळी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी झटत असताना, कायदेशीर व्यवसाय करण्यासाठी प्रयत्नशील असताना काही व्यावसायिकांनी गेली अनेक वर्षे कागदपत्रांचे नूतनीकरण न करताही व्यवसाय सुरू ठेवला असून अशी परवानगी बंदर विभागाकडून मिळत असेल तर सर्वच व्यावसायिकांना अशी परवानगी देण्यात यावी, अशी टीका यावेळी सौ. अन्वेषा आचरेकर यांनी करत नौका सर्व्हे करून सर्व्हे प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नसतानाही बंदर विभागाने केलेली कारवाई चुकीची आहे असे सांगितले. यावर प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. भुजबळ यांनी सर्वच व्यावसायिकांनी कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असल्याचे सांगितले.

यावेळी कॅ. भुजबळ यांनी सर्व जलक्रीडा व्यावसायिकांनी एकत्र येऊन एक खिडकी योजना राबवून समान दर निश्चित करावेत असे आवाहन केले. मात्र व्यावसायिकां कडून असा प्रयत्न यापूर्वी करूनही त्यास बंदर विभागाची साथ न मिळाल्याने अयशस्वी ठरल्याचे दामू तोडणकर यांनी सांगितले. तर सौ. आचरेकर यांनी मालवण मधील इतर किनारे सोडले तर केवळ दांडी किनाऱ्यावर एक खिडकी होत नसल्याचे सांगत याबाबत अधिकाऱ्यांनीच लक्ष घालावे, असे सांगितले. जलक्रीडा व्यवसायाचे दर समान ठेवण्यासाठी मेरीटाइम बोर्डनेच पुढाकार घेऊन एक खिडकी सारखी योजना राबवावी असे दिलीप घारे यांनी सांगितले.

देवबाग येथील कर्ली खाडीतील त्सुनामी आयलँड वर बॅरिगेट्स, लाईफ जॅकेट व इतर सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यवस्था होत नाही तोपर्यंत व्यावसायिकांनी त्याठिकाणी पर्यटकांना नेऊ नये असे यावेळी कॅ. भुजबळ यांनी सांगितले. त्सुनामी आयलँड ची आपण स्वतः पाहणी करणार असून त्यानंतरच तेथे जलक्रीडा सुरू करायचे की नाही याबाबत कळवू असेही भुजबळ यांनी सांगितले. यावर देवबाग मधील व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त करत व्यवसायिक पर्यटकांची पूर्णतः काळजी घेत असल्याचे स्पष्ट करत आयलँड सुरक्षित ठेवण्यासाठी खाडीतील गाळ काढणे महत्वाचे असल्याचे सांगितले.

पर्यटन संचालनालयाकडील जलक्रीडा व्यवसाय नोंदणी ग्राह्य मानली जात असेल तर जे पूर्वीपासून मेरीटाइम बोर्डाच्या कागदपत्रानुसार व्यवसाय करत आहेत ते अनधिकृत ठरतात का ? असा सवाल वैभव खोबरेकर यांनी करत पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करून अद्यापही नोंदणी सर्टिफिकेट मिळत नसल्याचे सांगितले. जलक्रीडा व्यावसायिकांनी बोटीवरील चालकांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे असे यावेळी भुजबळ यांनी सांगितले. तर व्यावसायिक एका छताखाली येण्यास तयार असतील तर पर्यटन व्यावसायिक महासंघ नोंदणी प्रमाणपत्र मिळवून देण्यास सहकार्य करू असे अविनाश सामंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा