सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करून पळाल्याच्या प्रकरणातील चारही आरोपी निर्दोष मुक्त
ओरोस जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; बचाव पक्षाचा युक्तिवाद आणि साक्षीदारांच्या उलटतपासणीचा ठरला आधार
सावंतवाडी :
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात चारही आरोपींची ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
दिनांक २० डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी १५.४५ ते १५.५० वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे कर्मचारी सावंतवाडी ते बांदा या मार्गावर गस्त घालत होते. यावेळी इन्सुली खामदेव नाका येथे MH-07-AG-0216 आणि MH-07-AG-9006 या दोन वाहनांमधून दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती.
त्यानुसार दुय्यम निरीक्षक श्री. जरांडे यांनी दोन्ही वाहनांना थांबविण्याचा इशारा केला. मात्र, पथकातील कर्मचाऱ्यांना चकवा देत संबंधित वाहनांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची सुमो गाडी MH-10-N-0757 हिने एका वाहनाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित वाहनाने भरारी पथकाच्या गाडीला धडक देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसऱ्या वाहनातील चालकानेही पथकाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून वाहन घेऊन पलायन केल्याचा आरोप होता.
या प्रकरणी तुषार विनायक तुळसकर, विठ्ठल संतोष चोगुले, सलीम निसार नदाफ आणि अजय सूर्यकांत कवठणकर यांच्याविरुद्ध बांदा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५३, १८६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्याची सुनावणी ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. खटल्यादरम्यान एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींचे वकील ॲड. परशुराम बाबुराव चव्हाण यांनी केलेली साक्षीदारांची उलटतपासणी, अंतिम युक्तिवाद तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचा आधार न्यायालयाने ग्राह्य धरला. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी चारही संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात आरोपींतर्फे ॲड. परशुराम बाबुराव चव्हाण व ॲड. शुभेश सुरेश वंजारी यांनी काम पाहिले.
