You are currently viewing ओसरगावच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन; संदेश पारकर यांच्या मध्यस्थीने तोडगा

ओसरगावच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन; संदेश पारकर यांच्या मध्यस्थीने तोडगा

ओसरगावच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन; संदेश पारकर यांच्या मध्यस्थीने तोडगा

वैभव नाईक, संदेश पारकर व सुशांत नाईक यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आंदोलन मागे; बबली राणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

ओसरगाव । :
ओसरगाव येथील रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आंदोलनस्थळी कणकवलीचे नगराध्यक्ष श्री. संदेश पारकर यांनी तातडीने भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली. रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेली ग्रिट आपल्या क्रशरवरून तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती त्यांनी ग्रामस्थांना केली.
मात्र, जोपर्यंत गावचे सरपंच व सत्ताधारी पदाधिकारी आंदोलनस्थळी येऊन ग्रामस्थांशी चर्चा करत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. वैभव नाईक, कणकवली नगराध्यक्ष श्री. संदेश पारकर व युवा सेना जिल्हाप्रमुख श्री. सुशांत नाईक यांनी यशस्वी मध्यस्थी केली. जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी दूरध्वनीवरून ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. तसेच रस्त्याच्या प्रश्नासाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ओसरगावात राजकीय घडामोडीलाही वेगळे वळण मिळाले. कळसुली विभागप्रमुख श्री. चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे राणे समर्थक भाजपला ओसरगावमध्ये राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ग्रामस्थांच्या या निर्णयाचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले असून, ओसरगावच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. आंदोलन, मध्यस्थी आणि त्यानंतर झालेला सामूहिक पक्षप्रवेश यामुळे ओसरगावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा