You are currently viewing ‘सिंधुदुर्ग २०४७’च्या नियोजनासाठी अभ्यास गटाकडून जिल्ह्याचा अभ्यास

‘सिंधुदुर्ग २०४७’च्या नियोजनासाठी अभ्यास गटाकडून जिल्ह्याचा अभ्यास

सिंधुदुर्ग : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे येथील स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड प्लॅनिंगच्या नियोजन विभागातील द्वितीय वर्षाच्या मास्टर ऑफ प्लॅनिंग (अर्बन अँड रिजनल) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास गट सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ‘स्ट्रॅटेजिक रिजनल प्लॅन फॉर सिंधुदुर्ग २०४७’ या विषयाचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यास गटासोबत बैठक घेण्यात आली. जिल्ह्याच्या विकासाच्या सद्यस्थितीचा, भविष्यातील गरजांचा तसेच विविध विकास प्रकल्पांचा अभ्यास करून शाश्वत व सर्वसमावेशक प्रादेशिक विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी अभ्यास गटाशी संवाद साधून सिंधुदुर्गच्या विकासाची दिशा, जिल्ह्याच्या भौगोलिक व नैसर्गिक वैशिष्ट्यांचा विचार करून राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम तसेच भविष्यातील विकासाच्या संधी याबाबत माहिती दिली. पर्यटन, पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, उद्योग, मत्स्यव्यवसाय, शेती, बंदरे, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याच्या विकासाला मोठी क्षमता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विकास करताना सिंधुदुर्गची निसर्गसंपदा, पर्यावरणीय समतोल आणि स्थानिक संस्कृती यांचे जतन होणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होत्या.

दरम्यान, ७ ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी, संबंधित विभागांशी संवाद आणि माहिती संकलन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सुरू असलेले, प्रस्तावित व आगामी विकास प्रकल्प, उपलब्ध पायाभूत सुविधा, प्रमुख समस्या, विकासाच्या शक्यता तसेच विविध विभागांकडील बिगर-गोपनीय माहिती, अहवाल, नकाशे व नियोजनाशी संबंधित कागदपत्रांचा अभ्यास या माध्यमातून करण्यात येणार आहे. या अभ्यासातून तयार होणाऱ्या ‘सिंधुदुर्ग २०४७’च्या धोरणात्मक प्रादेशिक आराखड्यातून जिल्ह्याच्या दीर्घकालीन, संतुलित, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासासाठी उपयुक्त दिशा मिळण्यास मदत होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा