9 सप्टेंबर जयंतीनिमित्त
स्व.डॉ. मोतीलाल राठी साहित्याला वाहिलेला धन्वंतरी
डॉक्टर तुमचे नाव राठी नाही मराठी असायला हवे होते
इतके तुमचे मराठीच्या क्षेत्रात काम आहे हे वाक्य आहे मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. मधुकर केचे यांचे. डॉ. मोतीलाल राठी या अमरावतीच्या सुपुत्राने मराठी साहित्यिकांसाठी इतके मोठे काम केले आहे की आज अमरावतीच्याच नव्हे तर विदर्भातील मराठीच्या तत्कालीन साहित्यिकांच्या हृदयामध्ये त्यांचे नाव कोरल्या गेलेले आहे.
खरं म्हणजे डॉक्टर माणूस हा त्याच्या वैद्यकीय व्यवसायात इतका गुंतलेला असतो की त्याला इतरत्र वेळ देणे शक्य नसते .पण याला अपवाद होते ते डॉ. मोतीलाल राठी. या माणसाने मधुकर केचे डॉ. भाऊ मांडवकर सुरेश भट उद्धव ज. शेळके बाबा मोहोड उषाताई चौधरी यांच्याबरोबरच अमरावतीचे साहित्य विश्व समृद्ध करण्याचे महत्त्वाचे काम केले. साहित्याबरोबरच शैक्षणिक आरोग्य व तपोवनचे विदर्भ महारोगी सेवा मंडळ यांना वेळ देऊन त्या त्या संस्थांच्या विकासाला प्रामाणिकपणे हातभार लावला.
आम्ही जे घडलो ते डॉ. मोतीलाल राठी यांच्या मुळेच. आमची पिढी म्हणजे बबन सराडकर शिवा इंगोले गंगाधर पुसदकर साहेबराव थोरात अशोक थोरात अरुण सांगोळे विष्णू सोळंके सुनिला झोड शोभा रोकडे शोभा गायकवाड संजय महल्ले कुमार बोबडे किशोर फुले अरविंद महल्ले सुधाकर देशमुख किशोर सानप राजेश महल्ले राजीव शिंदे मिर्झा रफी अहमद बेग या साऱ्यांना हातभार लावला तो डॉ. मोतीलाल राठी यांनीच.
1976 साली आम्ही साहित्य संगम ही संस्था स्थापन केली. त्याला आता पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. साहित्य संगम खऱ्या अर्थाने नावारूपाला आली ती डॉ. मोतीलाल राठी साहित्य संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर. त्यांनी खऱ्या अर्थाने या संस्थेला खतपाणी घातले. साहित्य संगमच्या विकासासाठी डॉक्टर एका कार्यकर्त्यांसारखे राबले.
अमरावतीच्या सुप्रसिद्ध अशा श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयांमध्ये हिंदी कवी संमेलन दरवर्षी व्हायचे. हिंदी कवी संमेलन व केशरबाई लाहोटी महाविद्यालय हे समीकरण ठरवून गेले होते. पण डॉक्टर मोतीलाल राठी यांनी या उपक्रमाला मराठी कवी संमेलन जोडले. ते श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचे पदाधिकारी व नंतर अध्यक्ष असल्यामुळे ते शक्य झाले. कवीश्रेष्ठ सुरेश भट मधुकर केचे देविदास सोटे सुरेश वैराळकर मंगेश पाडगावकर विंदा करंदीकर वसंत बापट मिर्झा रफी अहमद बेग शंकर बडे विठ्ठल वाघ श्रीकृष्ण राऊत नारायण कुलकर्णी कवठेकर या सगळ्यांना त्यांनी टप्प्याटप्प्याने लाहोटी महाविद्यालयांमध्ये बोलाविले व अमरावती शहराला मराठी कवी संमेलनाची सवय लावली.
त्या काळात सांस्कृतिक भवन नव्हते .विमलाबाई देशमुख हॉल नव्हता. टाऊन हॉल नव्हता. मग आमचे कार्यक्रम व्हायचे ते डॉक्टर साहेबांच्या बंगल्यावर. डॉक्टरसाहेबांचा टेबल टेनिसचा हॉल डॉक्टर साहेबांनी आमच्या साहित्यिक उपक्रमासाठी मोकळा करून दिला होता.
साहित्यिक कार्यक्रम असला की सौ कमलताई राठी प्रतीक राठी प्रवीण राठी व स्वतः डॉक्टर मोतीलाल राठी हे मोठ्या साहित्यिकांबरोबरच नवोदितांचे देखील मनापासून आदरतिथ्य करायचे.
सुरेश भटांचे संपूर्ण भारतात भरपूर कार्यक्रम झाले .पण सगळ्यात चांगला कार्यक्रम झाला तो अमरावतीलाच. तसे सुरेश भट यांचे लेखी पत्र माझ्याजवळ आहे. सुरेश भट अमरावतीचे .अरविंद ढवळे रामदास भाई श्राफ दादा इंगळे वली सिद्दीकी डॉ. मोतीलाल राठी मीना ढवळे ही सुरेश भटांवर खरी प्रेम करणारी मंडळी. सुरेश भटांनी नागपूरला जेव्हा रंग माझा वेगळा हा पहिला कार्यक्रम घेतला तेव्हा अरविंद ढवळे व डॉ.मोतीलाल राठी हे नागपूरला कार्यक्रमाला गेले व अमरावतीची तारीख घेऊनच आले.
रंग माझा वेगळा या कार्यक्रमासाठी डॉ. मोतीलाल राठी व अरविंद ढवळे यांनी तन मन धनाने मदत केली. अमरावतीच्या नगर वाचनालयामध्ये पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या या कार्यक्रमाला पाय ठेवायला जागा नव्हती इतकी प्रचंड गर्दी होती. विशेष म्हणजे कार्यक्रमाला तिकीट होते. तिकिटाचे पैसे घ्या व आम्हाला उभे तरी राहू द्या अशी विनंती रसिकांनी केली होती. विशेष म्हणजे डॉ. साहेबांनी पुढाकार घेऊन पन्नास वर्षांपूर्वी दैनिक नागपूर पत्रिकेची चार पानांची नागपूर टाईम्सची एका पानाची व दैनिक हितवादची पूर्ण पानाची पुरवणी काढण्यामध्ये खूप पुढाकार घेतला.
डॉ.मोतीलाल राठी यांचे निवासस्थान म्हणजे साहित्यिकांचे माहेरघर होते. त्यांच्या बंगल्यामध्ये गेस्ट हाऊस होते. तिथे हृदयनाथ मंगेशकर जीवन किर्लोस्कर सुरेश भट विठ्ठल वाघ शंकर बडे मिर्झा रफी नारायण कुलकर्णी कवठेकर या सारख्या नामवंत लेखक व कवींनी मुक्काम केला आहे. हृदयनाथ मंगेशकर यांचा जेव्हा अमरावतीला कार्यक्रम ठरला .तर मुक्काम कुठे करायचा. तेव्हा हॉटेल संस्कृती नव्हती. सर्व संयोजकांनी डॉ. मोतीलाल राठी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आणि डॉक्टर साहेबांनी खऱ्या अर्थाने हृदयनाथ मंगेशकर यांचे आदरतिथ्य केले.
सुरेश भट हे मोठे कवी. आज सर्वत्र त्यांचा बोलबाला आहे. पण त्यांच्या पडत्या काळात त्यांना खरी साथ दिली ती अरविंद ढवळे मीनाताई ढवळे आणि डॉ. मोतीलाल राठी यांनीच. सुरेश भटांचे घर अमरावतीत होते. पण मुक्काम राहायचा तो अरविंद ढवळे डॉक्टर मोतीलाल राठी दादा इंगळे वली सिद्दिकी नंतर हनुमान व्यायामशाळा व आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये माझ्या तपोवनच्या निवासस्थानी. कारणही त्याला तसेच होते. ही मंडळी सुरेश भटांचे सगळे लाड पूर्ण करीत होते. सुरेश भट यांना ते तळ हातावरील फोडाप्रमाणे जपत होते असे म्हटले तर वावगे होणार नाही.
डॉक्टर साहेबांना खऱ्या अर्थाने साथ दिली ती कमल ताईंनी .डॉक्टर साहेबांकडे येणारे जाणारे लोक मोठ्या संख्येने असायचे .डॉक्टर साहेबाकडून माणूस चहा नाश्ता न घेता गेला असा प्रसंगच निराळा. कमलताईंनी कधी कंटाळा केला नाही. प्रवीण व प्रतीक मोठे झाल्यावर ते पण हातभार लावायचे. बळवंतराव व भोपळे तसेच प्रभाकर हे डॉक्टर साहेबांचे कंपाउंडर नव्हते तर फॅमिली मेंबर होते. इतके प्रेम डॉक्टर साहेबांनी त्यांच्यावर केले.
त्या काळात तपोवनला जाण्यासाठी रिक्षावाला देखील तयार व्हायचा नाही. त्या काळात डॉक्टर मोतीलाल राठी पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन येथे नियमितपणे जाऊन रोगी तपासत होते. किती हे धाडस. आणि म्हणूनच दाजी साहेबांनंतर उत्तरार्धामध्ये डॉ. मोतीलाल राठी हे तपोवनचे अध्यक्ष झाले.
आरोग्य सेवा मंडळामार्फत त्यांनी ठिक ठिकाणी मोफत दवाखाने काढले .काही दवाखान्यांमध्ये ते स्वतः जायचे. डॉक्टरांनी त्यांच्या वैद्यकीय कौशल्याला कधी व्यवसायाचे स्वरूप दिले नाही. कमीत कमी औषध व ताबडतोब आराम हे त्यांचे सूत्र होते.
अमरावती शहराला साहित्याच्या बाबतीत समृद्ध करण्याचा तत्कालीन लेखकांना आधार देण्याचा व अमरावतीला एक साहित्यिक वातावरण तयार करण्यासाठी डॉक्टरांनी खूप मोठा पुढाकार घेतला आहे आणि म्हणूनच रहे ना रहे हम महका करेंगे या ओळीप्रमाणे आज ते जरी आमच्यात नसले तरी आमच्या साहित्यिक पिढीच्या हृदयात ते मात्र आजही कायम आहेत एवढे मात्र खरे.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
