You are currently viewing भुईबावडा येथे ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर
Oplus_16908288

भुईबावडा येथे ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर

वैभववाडी :

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ उपक्रमांतर्गत उपकेंद्र भुईबावडा, ग्रामपंचायत ऐणारी, विवेकानंद नेत्रालय व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यामंदिर एणारी येथे नेत्र तपासणी व सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरामध्ये एकूण ९१ लाभार्थींनी सहभाग घेतला. त्यापैकी ६२ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर नागरिकांना डोळ्यांची काळजी व आवश्यक उपचारांबाबत आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. यावेळी ६८ नागरिकांची असंसर्गजन्य आजार तपासणी, ४१ जणांची ECG तपासणी आणि ५७ जणांची हिमोग्लोबिन (HB) तपासणी करण्यात आली. तसेच ६० वर्षांवरील नागरिकांचे आरोग्य मूल्यांकन फॉर्म भरून घेण्यात आले.

शिबिरादरम्यान नागरिकांना कुष्ठरोग, हत्ती रोग (लिम्फॅटिक फायलेरियासिस), योग्य आहार, स्वच्छता आणि विविध आजारांपासून बचाव याबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. नियमित आरोग्य तपासणी, डोळ्यांची योग्य निगा आणि आजारांचे वेळीच निदान यांचे महत्त्व यावेळी पटवून देण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, सरपंच रविना सुर्वे, उपसरपंच संजय कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी दीपक केतकर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पदाधिकारी, मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर राठोड यांनी केले, तर शिबिराविषयी माहिती डॉ. करणसिंह पाटील यांनी दिली. डॉ. फातिमा (डिस्पेन्सरी भुईबावडा) यांनी बाह्यरुग्ण तपासणी केली. अजित नांदेसकर (LSO) यांनी रक्त तपासणी केली.

शिबिराच्या आयोजनासाठी समुदाय आरोग्य अधिकारी संध्या अशोक नरवाडे, आरोग्य सेवक कुणाल किशोर चव्हाण, आरोग्य सेविका प्रमिला जाधव, आरोग्य सेविका संजीवनी कांबळे, मेधा गुरव, रूपाली घुगरे तसेच मदतनीस राजश्री मोरे यांनी विशेष योगदान दिले.

शिबिराला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनुराधा गणेश बिराजदार, तालुका आरोग्य पर्यवेक्षक आनंदा पितांबर चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. करणसिंह पाटील, आरोग्य सहाय्यक रामा गवस, आरोग्य सहाय्यक शंकर राठोड आणि LSO अजित नांदेसकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

पदाधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेविका, मदतनीस, स्वयंसेवक व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हे आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा