You are currently viewing जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पावशी मिटक्याचीवाडी येथे संपन्न झाला शिक्षक दिन

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पावशी मिटक्याचीवाडी येथे संपन्न झाला शिक्षक दिन

कुडाळ :

५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती. हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. आपले जीवन घडवणारा, जीवनाला आकार देणारा शिक्षक हा एक शिल्पकार असतो. या शिक्षकांचे स्थान हे खूप महत्त्वाचे असते. शिक्षकांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठीचे निमित्त म्हणजे हा दिवस.

जिल्हा परिषदेच्या पावशी मिटक्याचीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन खूप अनोख्या पद्धतीने साजरा केला. मुख्याध्यापक श्रीम. महानंदा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आठ दिवस आधीच या कार्यक्रमाचे नियोजन केले. शालेय मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री कुमार प्रथमेश निलेश परब यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी मंत्रिमंडळाची सभा घेण्यात आली. या सभेत इयत्ता सातवी, सहावी व पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी शिक्षक बनतील. इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना मराठी, गणित, इंग्रजी, सभोवतालचे जग, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण इत्यादी विषयांचे अध्यापन करतील असा ठराव घेण्यात आला. इच्छुक मुलांनी आपली नावे दिली. विषय ठरवले कोणता घटक शिकवायचा व तो कसा शिकवायचा या संदर्भात मुलांनी मसूरकर मॅडम व सातार्डेकर सर त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी मुलगे शर्ट पॅन्ट व मुली साड्या नेसणार असे ठरवण्यात आले.

एक दिवस का होईना पण आपल्याला शिक्षक बनण्याचा मान मिळेल या विचाराने मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. लगबगीने मुले नियोजन करत होती . स्वच्छता सजावट इत्यादी कामात मुलांनी स्वतःला झोकून दिले. आपण जो घटक शिकवणार त्या घटकाचे नियोजन करण्यात मुले गढली होती. आपल्याच मोठ्या सवंगड्यांकडून एक दिवस शिकायला मिळणार यासाठी छोटी मुलेही उत्सुक होती.

शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी नियोजनाप्रमाणे शालेय परिपाठानंतर विद्यार्थ्यांनी वर्ग अध्यापनास प्रारंभ केला. भाषा, गणित, इंग्रजी, इतिहास हे विषय खूप तन्मयतेने हे शिक्षक शिकवत होते. शिक्षकांच्या खोलीत खुर्चीवर बसलेल्या चिमुकल्यांच्या हालचालीत भावी शिक्षकांचे चित्र स्पष्टपणे दिसत होते. त्यांच्या चा लण्या बोलण्यात सुद्धा एक वेगळी लकब दिसत होती. समरस होऊन ते बालशिक्षक शिकवत होते. तितक्याच तन्मयतेने त्यांचे विद्यार्थीही त्यांना प्रतिसाद देत होते.

मध्यान्ह भोजनात या बालचमुंसाठी आज खास बेत आखला होता. त्यांच्या आवडीच्या अळूवड्या स्वयंपाकी नलावडे काकी यांनी बनवल्या होत्या. वरण-भात उसळ अळूवडी व जिलेबी अशा मिष्टान्न भोजनावर यथेच्य ताव मारून विद्यार्थ्यांनी पुढील सत्राला सुरुवात केली.

संध्याकाळच्या सत्रात कला,कार्यानुभव,शारीरिक शिक्षण म्हणजेच खेळू करू शकू या विषयांच्या तासिका झाल्या. शाळेचा ढोलकी वादक प्रथमेश निलेश परब (इ सातवी ) झांजपटू निशाद पुरुषोत्तम तवटे (इयत्ता तिसरी) ढोलवादक गणपत वायंगणकर (इयत्ता सातवी) झुंजरी वादक शुभम शैलेश परब (इ ५वी) या विद्यार्थ्यांनी काही गाणी वादयाच्या तालावर मुलांकडून म्हणून घेतली. सर्व मुले आनंदाने या गाण्यांच्या ठेक्यावर फेर धरून नाचत होती. युक्ता आपा मेस्त्री, गौरवी संतोष वरक व अस्मिता वैष्णव तेली या मुलींनी चित्रकला, कार्यानुभव हे विषय घेतले. चित्रकलेत ठसेकाम गुलाब व विविध फुलांची चित्रे काढायला शिकवली. तसेच चहाच्या कागदी कप पासून सुंदर असा पेन स्टँड बनवायला शिकवला. रद्दी कागदापासून टोपी बनवण्याचे प्रात्यक्षिक घेतले. यश बाबुराव झोरे (इयत्ता सहावी) हर्ष सतीश देसाई शुभम शैलेश परब व साईश पांडुरंग नलावडे या विद्यार्थ्यांनी विविध खेळ घेतले. सावधान, विश्राम, संचलन, योगासने इत्यादींचे प्रात्यक्षिक घेतले.

सर्वात शेवटी सर्व विद्यार्थ्यांना हॉलमध्ये एकत्र बसवले. शिक्षक दिन साजरा केला त्याबद्दल शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मनोगत घेतले गेले. मसूरकर मॅडमनी आपल्या मनोगतातून सर्व मुलांचे कौतुक केले व शाबासकीची थाप मुलांना दिली. सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपले विचार आपल्या मनातील भावना मनोगताच्या रूपात मांडल्या.

एकंदरीत खूपच आगळ्यावेगळ्या उत्साहाच्या वातावरणात हा शिक्षक दिन मिटक्याचीवाडी शाळेत संपन्न झाला.

 

*✍🏻© सौ. आदिती मसुरकर*

उपशिक्षक शाळा पावशी मिटक्याचीवाडी

*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा