You are currently viewing दहीहंडी उत्सवासाठी सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा : राजू मसुरकर

दहीहंडी उत्सवासाठी सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा : राजू मसुरकर

दहीहंडी उत्सवासाठी सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा : राजू मसुरकर

सायंकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत रुग्णालयांत अतिरिक्त डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी उपलब्ध ठेवण्याची मागणी

सावंतवाडी :

आज शनिवार, गोकुळाष्टमीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. दहीहंडी फोडताना गोविंदांच्या थरावरून पडून गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. दरवर्षी या उत्सवादरम्यान अनेक जण अपघातग्रस्त होऊन रुग्णालयात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा विशेषतः सज्ज ठेवावी, अशी मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी केली आहे.
याबाबत मसुरकर यांनी सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. सुबोध इंगळे, जिल्हा निवासी अधिकारी डॉ. विशाल रेड्डी, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक, रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ तसेच १०८ रुग्णवाहिका सेवेचे जिल्हा प्रमुख अधिकारी विनायक पाटील यांच्याशी संवाद साधून आवश्यक आरोग्य सुविधांबाबत चर्चा केली.
दहीहंडी फोडताना अपघात झाल्यानंतर मोठ्या संख्येने रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळी रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी जनरल सर्जन, हृदयरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ तसेच अतिरिक्त परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
१०८ व १०२ रुग्णवाहिका गंभीर रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची मागणी
दहीहंडी उत्सवाच्या कालावधीत विशेषतः सायंकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत १०८ व १०२ रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. छोट्या-मोठ्या आजारांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध न करता डोक्याला गंभीर दुखापत (हेड इंज्युरी), हृदयविकाराचा झटका, सर्पदंश तसेच इतर गंभीर अपघाती रुग्णांसाठी रुग्णवाहिका प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात, असे मसुरकर यांनी सुचविले.
एक्स-रे, सिटीस्कॅन तंत्रज्ञांचीही उपलब्धता आवश्यक
अपघातग्रस्त रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये एक्स-रे व सिटीस्कॅन मशिनचे तंत्रज्ञ रात्री ७ ते १२ या वेळेत उपलब्ध ठेवावेत. तसेच आवश्यक वैद्यकीय व तांत्रिक कर्मचारी तत्पर ठेवून गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार सुरू होतील, याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी, अशी विनंती राजू मसुरकर यांनी केली आहे.
दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होत असताना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत गोविंदांना तात्काळ आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवणे आवश्यक आहे, असेही मसुरकर यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा