*घारपी शाळेत शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषद अध्यक्ष बनले ‘गुरूजी’*
*हातात पुस्तक घेत प्रमोद कामत यांनी विद्यार्थ्यांना केले अध्यापन; दोन तासांहून अधिक काळ शाळेत उपस्थिती*
*बांदा*
सह्याद्रीच्या पट्ट्यातील अतिदुर्गम व उपक्रमशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घारपी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला आगळावेगळा उपक्रम अनुभवायला मिळाला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सकाळी साडेदहा वाजता शालेय परिपाठापासून शाळेत उपस्थित राहून तब्बल दोन तासांहून अधिक काळ विद्यार्थ्यांमध्ये रमले.
यावेळी हातात पुस्तक घेत त्यांनी थेट वर्गात विद्यार्थ्यांना अध्यापन केले. शिक्षकाची भूमिका बजावत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, प्रश्न विचारले आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. शिक्षणाचे महत्त्व, नियमित अभ्यास, शिस्त आणि भविष्यातील ध्येय याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद अध्यक्ष स्वतः हातात पुस्तक घेऊन विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध नावीन्यपूर्ण व शैक्षणिक उपक्रमांचे प्रमोद कामत यांनी कौतुक केले. अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक घेत असलेल्या मेहनतीचे अभिनंदन करत त्यांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्याध्यापक श्री. जे. डी. पाटील, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे तसेच केंद्रप्रमुख ज्योत्स्ना देसाई यांना प्रमोद कामत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्षांनी विद्यार्थ्यांसोबत घालविलेला वेळ, हातात पुस्तक घेऊन केलेले अध्यापन आणि शाळेतील उपक्रमांचे केलेले कौतुक हा शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येचा विशेष क्षण ठरला.
