You are currently viewing टी व्ही मालिका आणि समाज

टी व्ही मालिका आणि समाज

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*टी व्ही मालिका आणि समाज*

 

एक काळ होता जेंव्हा समाजाचे प्रतिबिंब नाटक सिनेमात उतरत होतं आज टी व्ही सिरीयल ने नाटक सिनेमांची जागा घेतली आणि सारं काही विपरीत होऊ लागलंय.

 

सिरीयल मधे दाखवतात ते खरंच समाजात घडतंय?

याचं उत्तर जर हो असेल तर…….?

कोणती आई मुलाचा घटस्फोट व्हावा आणि दुसरं लग्न व्हावे म्हणून प्रयत्न करीत आहे?

आणि कोणती सून विभक्त झाल्यावरही त्याच घरांत राहते?

तेही, नायकाची नवीन बायको आल्यावरही?

कोणते नवरा बायको लग्नानंतर एकाच बेडवर झोपतात पण मधे उशांची चळत ठेवतात?

आणि सर्वात महत्त्वाचे, कोणाच्या बेडरुमचे दरवाजे अर्ध्यापर्यंत पारदर्शक काचेचे असतात?

 

या आधुनिकतेच्या युगात

कोणती सासू सुनेला काढा उकळायला लावते?

आणि कोणत्या सुनेला काढा उकळण्याचे ज्ञान आहे?

 

सुमारे१९६२ च्या दरम्यान भारत चीन युद्ध झाले आणि तेंव्हा हो! तेव्हांच!

भारत एक कृषिप्रधान देशासहित औद्योगिक क्षेत्रात विकास करणारा देश झाला.आणि तिथेच भारतात एकत्र कुटुंब पद्धतीतून विभक्त कुटुंब पद्धत अस्तित्वात आली .नोकरीच्या निमित्ताने घर ,शहर सोडावे लागले आणि कुटुंबे विभक्त झाली त्याचेच प्रतिबिंब त्यावेळी रंगमंचावर आलेल्या *”वेगळं व्हायचं मला”* ह्या नाटकांत दिसले होते.

*कृ ब देवलांनी “शारदा”* नाटकांतून बालविवाह च्या समाजात प्रचलित प्रथेला समाजापुढे मांडले होते.

 

आज परिस्थिती उलटी आहे.टी व्ही सिरीयल चे अनुकरण समाज करतोय.

 

आज आपल्या आजूबाजूला आपण पाहतो तर नवविवाहित एकमेकांना *एकेरी* त संबोधतांत इथे मात्र नवरा बायकोला *अहो जाओ* करतो.

आणि हो गर्भ श्रीमंत दाखवायचे तर,*ब्लॅक कॉफी* मस्ट हं!

आणि त्यातही *स्पेशालिटी* वगैरे असते बरे!

आता हे विचारु नका, *ब्लॅक कॉफी* बनवायचे असे काय विशेष म्हणून!

 

बहुतेक सिरियल्स मध्ये नाईलाजाने लग्न होते, आणि त्या नंतर सुरु होतो तो अदभूत अनाकलनीय प्रवास.

एकाच बेडवर झोपायचं पण मध्ये *उशांची चळत* ठेवून किंवा मध्ये *साडीचा पडदा* लावून किंवा *त्या* ने किंवा *ती* ने त्याच रूममध्ये जमिनीवर झोपून.

प्रश्न पडतो खरंच असं काही शक्य आहे?

शक्य असलेच तर काही केमिकल लोचा तर नाही?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी कपल्स कोणत्या समाजात दिसतात?

इथं तर सत्यनारायणा पर्यन्त पण………

 

काय सांगताहेत ह्या सिरियल्स?

आणि कोणत्या समाजाचे आहे हे प्रतिबिंब?

 

काही वेळा कुटुंब इतकी मोठी असतात, ते ही मुंबईत.

इतका प्रशस्त हॉल पण कोपऱ्यात एक अर्धवट भिंत.

कशाला काय?

चोरून बोलणे ऎकायला नको दुसऱ्याच्या नकळत?

 

अहो!

हे लेखकही अकलेचे तारे तोडताना दिसतात.

अभिषेक गणपतीला आणि तोंडाने गणपती अथर्वशीर्ष नाही तर रामरक्षा म्हंटली जाते .

बोला, आता काय बोलणार?

 

एक जिना वरच्या मजल्यावर जाण्यास अगदी मस्ट हं!

तो ही मेन हॉल मधूनच योजलेला.शिवाय गोल घुमटदार हँड रेस्ट, पाहिजेच पाहिजे.

कशाला काय?

नायिका गर्भवती झाल्यावर ढकलायला आणि काय?

त्या शिवाय का कथानक पुढे जाईन?

 

मला तर तो जिना दिसला रे दिसला की धस्स होतं!

ती नायिका *बिच्चारी* वगैरे वाटायला लागतं.

 

*गर्भवती* म्हणता?

तो एक अजून नवा अध्याय आहे इथे.

 

अचानक कथा लेखकाला आठवतं,

अरे,मध्ये उशी आणि पडदा आपणच तर लावलाय!

मग काय,पोटाला उशी लावली की झाली गर्भवती.

 

अचानक मध्येच कधीतरी लेखकच विसरतो ही एव्हढी खलपात्रे काय करताहेत?

मग तो कारण शोधू लागतो त्यांच्या खल प्रवृत्तीचं

आणि देतो चिटकवून काही तरी अतर्क्य कारण.

 

नायक पोलीस अधिकारी इ.असेल तर विचारूच नका!

सगळा वेळ घरच्यांच्या भानगडी सोडवण्यातच जातो बिचाऱ्या नायकाचा.

पोलिसी गणवेश अंगावर आणि सोडवतो घरच्या भानगडी.

काय डोंबलं ड्युटी करणार?

 

एखादी खल व्यक्ती जर घर सोडून जाण्यास निघाली की प्रमुख नायिका किंवा नायक तिने जाऊ नये म्हणून आटापिटा करतात.

त्यामुळे होते काय तर स्टोरी वाढतच जाते .

कदाचित,ती खलव्यक्ती घर सोडून गेली तर स्टोरी समाप्त होईल आणि आपला रोजगार बुडेल म्हणून आटापिटा असावा.

 

एक तर फार भयानक प्रकार आहे.

कुकरीज शोज त्या संदर्भातली स्पर्धा!

बरे, स्पर्धक कोण?

तर, तेच ते त्याच घरातील कपल्स किंवा जोडपी.ते ही एकमेकांसमोर!

बाहेरच्यांना नो एन्ट्री!

जिंकणार अर्थातच नायक आणि नायिकाच.

 

त्या कुकरी शोच्या स्पर्धेची मला नेहमीच कमाल वाटत आली आहे. खरी कमाल तर त्या स्पर्धेतल्या परीक्षकांची म्हणायला हवी.

त्यांचे परीक्षक असतात ना जे त्या पदार्थांची चव वगैरे बघून मार्क वगैरे देत असतात त्यांच्या बद्दल तर मला नेहमीच आश्चर्य वाटत असते.

पहिला पदार्थ खाल्ल्यानंतर शेवटच्या पदार्थाला कितपत ते न्याय देत असतील शेवटी रसना म्हणजे जीभ एकच आहे ना?

पोट भरत आल्यानंतर आपल्याला कितीही स्वादिष्ट खायला दिलं तरी सुरुवातीला आवडलेला पदार्थच आपल्याला बेचव वाटू लागतो मग या परीक्षाकांकडे अशी काय *खास जादू* आहे की ते शेवटच्या पदार्थाला सुद्धा न्याय देऊ शकतात ?

 

मग या परीक्षकांनाच कसे काय त्याची गुणवत्ता समजते?

मी शेवटच्या पदार्थांच्या टेस्टिंग संदर्भात बोलतोय.

 

असो,

*जो भी है वो ठीक है जिकर् क्यू करे?*

*हम ही सब जहान की फिक्र क्यू करे?*

 

एक मात्र जाणवते मला एकच प्रश्न पडतो *शिरवाडकर कानिटकर* जर आज असते तर त्यांनी कपाळावर हात मारून घेतला असता

 

— राजा जोशी

०३ सप्टेंबर २०२६

〰️〰️〰️〰️〰️〰️

प्रतिक्रिया व्यक्त करा