सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संघटकपदी चंद्रकांत उर्फ बाळा गावडे
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्गातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड; जिल्ह्यातील संघटनात्मक जबाबदाऱ्यांचे वाटप
सावंतवाडी :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली आहे. यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे संघटक म्हणून चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बाळा गावडे हे गेल्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उबाठा शिवसेनेचे उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार मानले जात होते. आता त्यांच्यावर विधानसभा मतदारसंघाच्या संघटनात्मक बांधणीची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेला नव्याने बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्तेपदी डॉ. जयेंद्र परुळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वेंगुर्ले उपजिल्हाप्रमुखपदी संजय गावडे, वैभववाडी उपजिल्हाप्रमुखपदी लक्ष्मण रावराणे, दोडामार्ग उपजिल्हाप्रमुखपदी रामराव उर्फ चंदन गावकर यांची निवड झाली आहे.
वैभववाडी उपजिल्हा संघटकपदी वसंत खानविलकर, दोडामार्ग उपजिल्हा संघटकपदी लक्ष्मण आयनोडकर, मालवण उपजिल्हा संघटकपदी विनोद सांडव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय कणकवली तालुका प्रमुख म्हणून राजू राठोड, वैभववाडी तालुका संघटक म्हणून रमाकांत मोरे, सावंतवाडी तालुका संघटक म्हणून निशांत तोरस्कर, वेंगुर्ले तालुका संघटक म्हणून विजय नाईक, कुडाळ उपतालुका संघटक म्हणून राजेश टगसाळी, तर ओबीसी सेल कुडाळ तालुका संघटक म्हणून नारायण उर्फ आप्पा मांजरेकर यांची निवड करण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी असून, या नियुक्त्यांमुळे सिंधुदुर्गातील उबाठा शिवसेनेच्या संघटनात्मक हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
